सावध व्हा, पुन्हा धोका वाढतोय! मुंबईतला रुग्णवाढीच्या दरात वाढ

मिलिंद तांबे
Wednesday, 16 September 2020

मंगळवारी  दिवसभरात 1,585 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,73,534 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 वरून वाढून 1.28 टक्क्यांवर  गेला आहे.

मुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहरात कोरोनाचा अधिक प्रार्दुभाव पाहायला मिळाला आहे. काही प्रमाणात नियंत्रणात आलेला कोरोनानं मुंबईत पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातच सुखावणारी गोष्ट म्हणजे,  मंगळवारी मुंबईत वाढलेला रुग्णांचा आकडा दोन हजारच्या खाली आला. मंगळवारी  दिवसभरात 1,585 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,73,534 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 वरून वाढून 1.28 टक्क्यांवर  गेला आहे. मुंबईत काल दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,227 वर पोहोचला आहे. मुंबईत मंगळवारी 1,717 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.

मुंबईत मंगळवारी नोंद झालेल्या 49 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. मंगळवारी एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 36 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षाखालील होते.  33 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते. तर 14 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते.  

मंगळवारी 1,717 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,34,066 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 54 दिवसांवर गेला आहे. 14 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,36,574  कोविड चाचण्या करण्यात आल्या.  8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.28 वर स्थिर आहे.   

मुंबईत 592 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.  सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 8,763 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 16,304 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,419 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेताहेत.
 
जी उत्तरमधील रूग्णवाढ आटोक्यात

गेल्या तीन दिवसांपासून 100 च्या वर गेलेली रूग्णसंख्या मंगळवारी आटोक्यात आली असून जी उत्तरमध्ये मंगळवारी  52 नव्या रुग्णांची भर पडली. धारावीसह दादर, माहिममध्ये देखील बाधित रूग्णांची संख्या घटली आहे. धारावीमध्ये मंगळवारी दिवसभरात 7 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 2,945 इतकी झाली आहे. तर 144 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादरमध्ये 25 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,058 इतकी झाली आहे.तर 466 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये  20 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2,782 इतकी झाली. तर 493 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात मंगळवारी 52 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8,785 वर पोहोचला आहे.  आतापर्यंत 526 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

धारावीमध्ये 2,530, दादरमध्ये 2,490 तर माहीममध्ये 2,192 असे एकूण 7,212 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.  1,103 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

-----------------

(संपादनः पूजा विचारे)

Covid 19 Mumbai reports 1,585 new cases growth rate is 1.28


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Mumbai reports 1,585 new cases growth rate is 1.28