esakal | यंदा ख्रिसमसची गजबज नाही पण मनातला उत्साह कायम
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा ख्रिसमसची गजबज नाही पण मनातला उत्साह कायम

25 डिसेंबरचा नाताळ सण आल्याने चर्चमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये आणि दुकानांमध्ये उत्साहाने जोरदार तयारी सुरु आहे.

यंदा ख्रिसमसची गजबज नाही पण मनातला उत्साह कायम

sakal_logo
By
दिनेश चिलप मराठे

मुंबईः  शांतिदूत भगवान येशु ख्रिस्ताच्या जन्म सोहळयाचा उत्सव म्हणजेच 25 डिसेंबरचा नाताळ सण आल्याने चर्चमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये आणि दुकानांमध्ये उत्साहाने जोरदार तयारी सुरु आहे. अनेक चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी ख्रिस्तजन्म सोहळा होईल, तर काही ठिकाणी हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात भाविकांना पाहता येईल. 

मात्र सध्या दुकानात विक्रीस असलेल्या सांटाक्लॉज, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल, सांटा कॅप, चॉकलेट्स, केक, चॉकलेट वाईन केक्स, जिंगल्स साँग टॉईज आणि वेगवेगळ्या खेळण्याच्या मागणीत अजूनही हवी तशी वाढ होत नसल्याने विक्रेते चिंतेत आहेत.

केवळ ख्रिस्ती नागरिकांमध्येच नव्हे तर ख्रिस्ती चर्चच्या कॉन्व्हेंट शाळेत शिकलेल्या हिंदू मुलांमध्येही या सणाचे आकर्षण असते. अनेक शाळांमध्ये भगवान येशूच्या जन्मसोहळ्याचे देखावेही सजवले जातात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ख्रिस्ती भाविक 24 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता चर्चमध्ये आधुनिक पोशाखात प्रार्थनेसाठी उपस्थित राहतात. येशुजन्माची आणि धार्मिक गीते विविध वाद्यांवर सामूहिकपणे गायली जातात. चर्च चे फादर येशूला नमन करीत उपस्थिताना संबोधित करताना येशु जन्माचे अध्याय कथन करतात. बरोबर मध्यरात्री येशु ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे जाहिर करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र यंदा मात्र कोरोनाच्या फैलावामुळे ख्रिस्ताच्या जन्मदिनावर कोरोनाचे सावट आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अनेक चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना होणार नसून येशूजन्माचा ऑनलाईन सोहळा प्रसारित होईल.  

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एरवी दक्षिण मुंबईत कुलाब्यापर्यंत ख्रिसमसच्या आठवड्यात सणाच्या तयारीची गजबज दिसत असे. मात्र सध्या येथील कार्यालयेही बंद आहेत आणि रेल्वे बंद असल्याने नोकरदारांची गजबजही नाही. त्यामुळे स्वागताच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. अर्थात त्यामुळे भाविकांच्या मनातील भक्तीभाव जराही कमी झाला नाही. चर्चमध्ये शक्य झाले नाही तर घरातच भक्तीभावाने देवाची प्रार्थना करून उत्साहाने सण साजरा करण्याचा त्यांचा निर्धार आहे. 

कोरोनामुळे आज पूर्वीसारखा उत्साह पहायला मिळत नसला तरी एक पारंपरिक सण म्हणून अनेक मराठी - कोळी ख्रिस्ती बांधवांनी दीपावली सणाप्रमाणे लाडू, करंज्या आणि शंकरपाळी केल्याचे दिसून आले. घरासमोर स्टार, तोरणे आणि दिवाळीसारखे कंदीलही लावले आहेत. गोव्याची फेणी, काजू फेणी, राइस फेणी, दर्जेदार वाइन्स आणि वाइन्स केकचे खास बेतही आखले आहेत.

माझगावचे सेंट मेरी चर्च, रोजरी चर्च, गिरगाव चर्च, फोर्ट चे सेंट थॉमस चर्च, कुलाबा कडे जाणाऱ्या मार्गावरील सेंट फ्रांसिस झेविअर, बॉम्बे बाप्टिस्ट चर्च असे प्रख्यात चर्च दक्षिण मुंबईत आहेत. येथे ख्रिसमस सणाची तयारी सुरु आहे. 

शुक्रवारी सकाळी प्रार्थना

302 वर्षाचे सर्वात जुने सेंट थॉमस चर्च फोर्टच्या रिजर्व्ह बँक कॉलनी परिसरात आहे. कोरोना काळात सरकारने दिलेले नियम पाळत 25 डिसेंबरच्या सकाळी 9 ते 10 दरम्यान येशुचा जन्मोत्सव आनंदात साजरा करणार आहोत. यंदा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास मिळणार नाही. पण जगात कोरोना संपावा, जगात आनंददायी शांति व्हावी अशी प्रार्थना परमेश्वराकडे केली जाईल, असे फोर्टच्या सेंट थॉमस चर्चचे रे. अविनाश रंगय्या यांनी सांगितले. 

हेही वाचा-  राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण, आरोग्यमंत्र्यांची माहिती

कुलाबा येथील अफगाण चर्चमध्ये एक हजार भाविक एकावेळी प्रार्थना करू शकतात. भगवान येशु ख्रिस्ताचा जन्म मानवाच्या कल्याणासाठी झालेला आहे. त्याचमुळे आताही प्रभूच्या जन्मोत्सवात कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यास आपण समर्थ आहोत. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार 25 डिसेंबरला सकाळी नऊ वाजता चर्च उघडेल आणि ते साडेदहापर्यंत ख्रिस्त जन्म सोहळा आणि बायबलमधील महत्वाचे आशीर्वचन पठण तसेच सर्व बांधवांना शुभेच्छा देत जन्मोत्सव साजरा करण्यात येईल, असे येथील रेव्हरंड स्वप्नील उझगरे यांनी सांगितले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

covid 19 rules christmas mumbai maharashtra government issue guildlines