कोविड-19 लस कर्करूग्णांसाठी अतिशय फायदेशीर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

कोविड-19 लस कर्करूग्णांसाठी अतिशय फायदेशीर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

मुंबई: देशभरात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडला होता. पण आता लवकरच कोविड-19 लस उपलब्ध होत असल्याने या लसीमुळे 90 ते 95 टक्के संक्रमण होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. या लसीचे काही किरकोळ दुष्परिणाम सुद्धा असू शकतात. मात्र, ही लस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे कर्करूग्णांसाठी ही लस अतिशय फायदेशीर ठरू शकते. कारण, कर्करोगावर उपचारासाठी रूग्णांची रोगप्रतिकारक शक्ती बळकट असणं गरजेचं आहे. मात्र, कर्करूग्णांनी ही लस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

रुग्णालयात संसर्गाचा धोका अधिक

कर्करूग्णाला लस टोचून घेण्यासाठी रूग्णालयात जावे लागेल. यामुळे संसर्गाचा धोका अधिक संभवतो. जर एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून लस मिळत असेल तर कर्करूग्णांना यामुळे मदत मिळेल. कारण, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रोगाचा प्रसार होण्याचा धोका शक्यतो कमी असतो. याशिवाय कर्करूग्णाचा लस घेण्यासाठी रूग्णालयात जाण्याचा त्रास वाचू शकेल.

कर्करोग रुग्ण अँड असोसिएशनचे स्त्रीरोगविषयक कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत न्याती यांनी सांगितले की, 'कर्करूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनाचा सर्वाधिक धोका यांना होता. पण, आता कोविड-19 लस उपलब्ध झाल्यास कर्करूग्णांना याचा नक्कीच फायदा होईल. पण प्रत्येक रूग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार लस द्यायची की नाही हे ठरवलं जाईल. मुळात, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी सुरू असणाऱ्या रूग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लस टोचणं गरजेचं आहे. कारण, कर्करोग हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे लसीमध्येही प्रकार आहेत. हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.'


लस टोचताना वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा

वाशीच्या ऑन्कुरा कॅन्सर केअर अँण्ड एमजीएम रूग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. पुष्पक चिरमाडे यांनी सांगितले की, 'कुठल्याही घातक विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी लस ही मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. कारण, शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर विषाणूंविरूद्ध लढता येऊ शकते. पण, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी सुरू असणाऱ्या कर्करूग्णांमध्ये लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो. कारण, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या कर्करूग्णांना लस दिल्या तर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.'

लस किती फायदेशीर?

कोविड-१९ या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी भारतातील पहिली स्वदेशी एमआरएनए ही लस अतिशय सुरक्षित आहे. ही लस शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी तयार करते. त्यामुळे कर्करोगाच्या रूग्णांना या लसीचा मोठ्याप्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यातच यूएसच्या फायझर कंपनीनं तयार केलेली कोरोना लस ही एमआरएनए वर आधारित आहे. ही लस मँसेजर-RNA म्हणजे एमआरएनए (mRNA) पद्धतीचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. यामध्ये पारंपारिक पद्धतीने लशीची निर्मिती केली जात नाही. अशा लशी शरीरात कोणतं प्रोटिन तयार करायचं आहे, याच्या सूचना शरीराला देतात जेणेकरून आजाराविरोधात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकेल. ही लस पूर्णपणे सुरक्षित मानली जाते आणि त्याचे परिणामही चांगले दिसून येतात असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

लसीकरणानंतरही खबरदारी बाळगणे गरजेचे

डॉ. चिरमाडे पुढे म्हणाले की, 'कोरोनापासून बचाव व्हावा याकरता लसीच्या चाचण्यांमध्ये अद्यापही कर्करोगासारख्या गंभीर विकाराच्या रूग्णांना आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही, हे माहिती असणं गरजेचं आहे. लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याबद्दल माहिती मिळू शकेल. पण, लसीकरण करून घेतल्यानंतरही मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे याबाबत खबरदारी घेणं आवश्यक आहे.'

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 vaccine very beneficial for cancer patients according medical experts

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com