esakal | नवी मुंबईत अत्याधुनिक कोरोना रुग्णालय; वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील काम अंतिम टप्प्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

vashi ccc

कोरोनाबाधित रुग्णांसाठी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात तयार होत असणारे कोरोना रुग्णालय लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत अत्याधुनिक कोरोना रुग्णालय; वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील काम अंतिम टप्प्यात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांसाठी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात तयार होत असणारे कोरोना रुग्णालय लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयात एका वेळेस सुमारे 1200 रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. 

वाचा ः शाब्बास योद्ध्यांनो... मुंबईतील पोलिसांनी केली कोरोनावर यशस्वी मात

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी महापालिकेच्या विशेष पुढाकारातून हे रुग्णालय उभे राहणार आहे. मार्चपासून आत्तापर्यंत शहरात अडीच हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील 60 टक्के रुग्ण बरे झाले आहेत; मात्र रुग्ण वाढण्याचे सत्र संपलेले नाही. रोजच्या रोज रुग्ण सापडत आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल 200 रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने रुग्णालये अपुरी पडण्याची शक्यता आहे. तसेच परवानगी देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातील खर्च प्रत्येकाला न परवडणारा आहे. त्यामुळे महापालिकेचे स्वतःचे कोव्हिड रुग्णालय असावे, अशी मागणी विविध नेतेमंडळींनी केली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्राची जागेत 1192 खाटांचे अत्याधुनिक कोव्हिड रुग्णालय उभारण्याचा निर्णय 15 दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार अभियांत्रिकी आणि आरोग्य विभागाने रात्रंदिवस काम करून रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या खाटा, पंखे, अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन यंत्रणा उभी केली आहे. 

वाचा ः अधिकार नसलेल्या अधिकाऱ्याने काढलेले परिपत्रक रद्द करा; इंटकची मागणी

रुग्णवाढीसोबत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढतच चाललेली आहे. आत्तापर्यंत 88 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कोरोनामुळे बहुतांश रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे या रुग्णालयात 500 खाटांना ऑक्सिजन व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त 12 व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध केले जाणार आहेत. आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाने या रुग्णालयावर सुमारे 12 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच रुग्णालयातील रुग्णांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा तैनात केला जाणार आहे. 

वाचा ः लॉकडाऊन शिथिल होताच मुंबईत 'इथे' झाली वाहनांची तोबा गर्दी; मात्र कारण तरी काय?

सर्व रुग्णांना हलवणार
वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोव्हिड 19 विशेष रुग्णालय सुरू झाल्यानंतर या केंद्रात सर्व कोरोनाबाधित रुग्ण स्थलांतरित करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. नवी मुंबई शहरापासून दूर असल्यामुळे टीकेचा धनी झालेल्या इंडिया बुल्स क्वारंटाईन केंद्रातील सर्व रुग्ण वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहे. एकाच ठिकाणी रुग्ण असल्यास प्रशासनालाही सेवा देण्यास सहकार्य होणार आहे. 

राजकीयदृष्ट्या महत्त्व
वाशीमध्ये सिडको प्रदर्शन केंद्रात नवी मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेना अशा महत्त्वाच्या पक्षातील नेतेमंडळींनी मागणी केली होती. त्यामुळे या रुग्णालयाला आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पंधरा दिवसांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. एकदा भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी पाहणी दौरा केला होता. त्यामुळे हे रुग्णालय सुरू झाल्यावर राजकीय श्रेय घेण्यावरून चढाओढ निर्माण होणार आहे. 

वाचा ः बालमृत्यू रोखण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराचा पुढाकार; जाणून घ्या काय करणार आहेत...

कोरोनाबाधित रुग्णांना हव्या असणाऱ्या सर्व उपचारांची माहिती घेऊन यंत्रणा उभारण्यात आली आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी साहित्य उपलब्ध झाले आहेत. येत्या काही दिवसांत काम पूर्ण झाल्यावर लोकांसाठी खुले केले जाईल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

loading image