एकदा निगेटिव्ह झालेल्या रुग्णांवर पुन्हा उलटतोय कोरोना? 13 जणांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह

अनिश पाटील
Tuesday, 15 September 2020

13 जणांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह, यापूर्वीही 40 जणांना झालेली कोरोनाची लागण

मुंबई : मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील आणखी 23 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली झाली आहे. गंभीर बाब म्हणजे त्यातील 13 जणांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. जुलै महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार करून अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आले होते. यापूर्वी तेथील 40 जणांना कोरोनाची लागण झाली होती. खरदारीचा उपाय म्हणून सुधारगृहातील 38 जणांची शनिवारी चाचणी करण्यात आली होती. त्यात तीन कर्मचा-यांचाही समावेश आहे. त्यात 23 जणांना कोरोना झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. 

त्यात सुधागृहातील एकमेव डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे जुलै महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या 13 जणांचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करून त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी ती निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना कोविड केअर सेंटरमधून सोडण्यात आले होते. आता पुन्हा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता या सर्वांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे, की चाचणीत काही चूक झाल्यामुळे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते अद्याप स्पष्ट नसल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

महत्त्वाची बातमी : मुंबईत कोरोना रूग्णवाढ सुरूच; परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जातेय का ?

23 जणांमध्ये 10 गतीमंद व्यक्ती आणि दोन कर्मचा-यांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनाची लागण झालेली मुले आणि अनेक कर्मचा-यांमध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत.

मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठीही शेल्टर होम आहे. त्यात लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात येते. या सुधारगृहात सध्या 268 व्यक्ती आहेत. त्यातील काहींना लक्षण आढळल्यामुळे जुलै महिन्यात 60 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील 40 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाच महिलांचाही समावेश होता. तसेच त्यात मुलांची देखभाल करणारा कर्मचारी, एक स्वच्छता कर्मचारी, एक आचारी, डॉक्टर यांचा समावेश आहे.  त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करून परत पाठवण्यात आले होते.

( संपादन - सुमित बागुल )  

covid patients are getting covind for second time 13 people are once again positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid patients are getting covind for second time 13 people are once again positive