तुम्हाला हे माहितीये का? कोरोना न्यूमोनियाग्रस्त रुग्णांना आहे पल्मनरी फायब्रोसिसचा धोका

भाग्यश्री भुवड
Thursday, 6 August 2020

मुंबईतील केईएममध्ये 22 जण पुन्हा उपचारांसाठी दाखल

मुंबई : कोरोनातून बरे झालेले 22 रुग्णांना महिनाभरात पुन्हा रुग्णालयात दाखल करायची वेळ आल्याने केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण, या रुग्णांना कोरोनानंतर पल्मनरी फायब्रोसिस हा आजार झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते हा आजार टिबी रुग्णांमध्ये आढळतो. त्यामुळे, एवढ्या कमी काळात फायब्रोसिसचा धोका होणे हे भितीदायक ठरू शकते. कोविडमध्ये न्यूमोनिया झाल्यानंतर पल्मनरी फायब्रोसिस होऊ शकतो. 

पल्मनरी फायब्रोसिस हा एक फुप्फुसाचा आजार आहे. ज्यात तंतूमय फुप्फुसाना जखमा होऊन ते टणक होते आणि त्याच्यावर व्रण उमटतात. व्रण उमटल्याकारणाने त्यांची श्वासातील प्राणवायू आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची क्षमता कमी होते. परिणामी, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्णाला पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतो. 

मोठी बातमी - रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन आणि म्हणालेत...

केईएम रुग्णालयात आलेल्या 22 रुग्णांपैकी एकही रुग्ण श्वासासंबंधित किंवा फुप्फुसाला कोणत्याही प्रकारची इजा झाल्याची तक्रार घेऊन दाखल झाला नव्हता. सध्या या रुग्णांवर उपचार सुरू असुन अँटी फायब्रोसिस औषधं दिली जात असुन त्यांच्या फुप्फुसावर आलेले व्रण कमी करण्याचा डॉक्टर प्रयत्न करत आहेत. या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सीजनचे वाढवण्यावरील उपचार सध्या केले जात आहेत. तर, 22 पैकी 5 जणांना ऑक्सिजनची मशीन देण्यात आली असुन त्यांना घरीच ऑक्सिजन घेता येईल याची पुर्तता करण्यात आली आहे. शिवाय, त्यांना ऑक्सिजनची गरज थोड्याच प्रमाणात असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

डॉ. देशमुख यांनी सांगितले की, या सगळ्या रुग्णांमध्ये एक गोष्ट सामान्य होती ती म्हणजे या सर्वांना न्यूमोनिया झाला होता. तेव्हा त्यांची कोविड 19 ची ट्रीटमेंट सुरु होती. या सगळ्यांनी एक महिन्याहून अधिक काळ आयसीयू मध्ये काढला असुन त्यांना टोसीलीझुमॅब, रेमडेसिवीर आणि स्टेरोइड्स देण्यात आले होतं उपचारादरम्यान, हे रुग्ण हाय फ्लो ऑक्सिजन देऊन बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 

दरम्यान, कोविड 19 च्या 40 टक्के रुग्णांना श्वासासंबंधित आजार होतात. 25 टक्के जणांना पल्मनरी फायब्रोसिस होतो अशी माहिती एका तद्य डॉक्टरांनी दिली आहे. 

धक्कादायक ! निकृष्ट मास्क वापरल्यास कर्करोगाचा धोका, तुमचा मास्क सुरक्षित आहे का?

22 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह होते. बरे होऊन ते घरी गेले. जेव्हा त्यांच्या फुप्फुसावरील जखमा बऱ्या झाल्या तेव्हा त्याचे व्रण त्यांच्या फुप्फुसावर आले आहेत. त्याला पल्मनरी फायब्रोसिस असं म्हणतात. रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजन कमी होते. त्यांना दम लागायला लागतो. अशी त्याची लक्षणे असतात. आता हे रुग्ण कोविड निगेटीव्ह आहेत. पण, त्यांना दाखल करुन त्यांच्यावर या आजारावरील उपचार सुरु आहेत. त्यांना हा आजार कायमस्वरुपी राहू शकतो. सध्या त्यांना ऑक्सिजन दिले जात आहे. साधारण दोन अडीच महिन्यांपूर्वीचे हे रुग्ण आहेत. कोरोना न्यूमोनियाग्रस्त रुग्णांना हा पल्मनरी फायब्रोसिसचा धोका असू शकतो. - डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

टीबी मध्ये होतो पल्मनरी फायब्रोसिस - 

शिवडी टीबी रुग्णालयाचे डीन डॉक्टर ललितकुमार आनंदे म्हणालेत, पल्मनरी फायब्रोसिसमध्ये फुप्फुसे खुप टणक होतात. खरंतर, टीबी रुग्णांमध्ये काही काळनंतर हा आजार होतो. पण, कोरोनाच्या रुग्णांमध्ये हे खुप लवकर आढळलं आहे. हा आजार रेडीएशन देऊन बरा होऊ शकतो. किंवा तो होऊ नये म्हणून व्हिटामीन सी देखील सुरु करता येऊ शकते. या रुग्णांना पल्मनरी रिहॅबिलेटेशन्स करावे लागणार आहे. म्हणजेच फुप्फुसाचे व्यायाम सुरु करावे लागतील. तेव्हाच त्यांच्या फुप्फुसाची रिकव्हरी होईल. शिवाय, यावर संशोधनाची गरज आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

covid19 patients with pneumonia might get pulmonary fibrosis says doctors


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 patients with pneumonia might get pulmonary fibrosis says doctors