
डोंबिवलीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार; दोघांना अटक
डोंबिवली - घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना डोंबिवलीत सिलेंडरचा काळाबाजार जोरात होऊ लागला आहे. सिलेंडर चोरीच्या घटनेनंतर आता घरगुती सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस भरत ग्राहकांना जास्त दरात कमी वजनाचे गॅस सिलेंडर देत असल्याची घटना उघड झाली आहे. मानपाडा पोलीसांनी याप्रकरणी बाळप्पा उनगप्पा ईरगदिन (वय 42) व महेश गुप्ता (वय 35) या दोघांना डोंबिवलीतून अटक केली आहे. शनिवार पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घरगुती गॅस मधून लोखंडी नोजल पिन च्या सहाय्याने ते व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरत असल्याचे उघड झाले आहे.
डोंबिवली जवळील हेदुटने शिरढोन रोडवर एका वीटभट्टीच्या मागे उघड्यावर गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी होत असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. त्यानुसार मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने प्राप्त माहिती व फोटो वर हेदुटने येथील वीटभट्टीवर जाऊन चौकशी केली असता तेथे काही आढळून आले नाही. त्यानंतर फोटोमधील टेम्पोवरील मोबाईल नंबरवर पोलिसांनी फोन करून टेम्पो चालक विनोदकुमार रामशब्द यादव ( वय ३५) याला सोनारपाडा येथून ताब्यात घेतले. यादवने महेश गुप्ता याला भारत गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यासाठी टेम्पो भाड्याने दिला होता. तो गॅसचा काळाबाजार करत असल्याचं माहीत झाल्याने त्याने महेश कडून टेम्पो परत काढून घेतला होता.
यादव यांच्याकडून महेशची माहिती काढत गुन्हे शाखा घटक 3 ने डोंबिवलीतील सांगावं येथून महेश व लोढा हेवन येथून बाळप्पा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 घरगुती सिलेंडर व 2 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी हे आपसात संगनमत करून भारत गॅसचे घरगुती सिलेंडर मधुन लोखडी पोकळ नोजल चे सहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरत होते. त्यानंतर ते ग्राहकांना कमी वजनाचे गॅस जास्त दराने विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून. आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी दिली. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सुर्यवंशी हे करीत आहेत.