निर्णायक मताचा नगराध्यक्षांना अधिकार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

उपनगराध्यक्ष पदासाठी मतदानाचा हक्क
मुंबई - थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विविध अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारने याबाबतचा आदेश राज्य सरकारने गुरुवारी दिला आहे. या अधिकारात उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक म्हणून नगराध्यक्षाला मतदान करता येणार आहे, तसेच समसमान मते पडल्यास निर्णायक मताचादेखील अधिकार देत नगराध्यक्षाला दुहेरी अधिकार प्राप्त झाले आहेत.

उपनगराध्यक्ष पदासाठी मतदानाचा हक्क
मुंबई - थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विविध अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारने याबाबतचा आदेश राज्य सरकारने गुरुवारी दिला आहे. या अधिकारात उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक म्हणून नगराध्यक्षाला मतदान करता येणार आहे, तसेच समसमान मते पडल्यास निर्णायक मताचादेखील अधिकार देत नगराध्यक्षाला दुहेरी अधिकार प्राप्त झाले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक म्हणजे 52 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यापैकी 18 ते 20 ठिकाणी भाजपकडे साधे बहुमतही नाही. नगराध्यक्ष भाजपचा आणि नगरसेवक इतर पक्षांचे, अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षांना अनेक अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नामनिर्देशित सदस्य निवडताना समान संख्या असलेल्या गटापैकी एका गटात स्वतःचा समावेश करून त्या पक्षाची सदस्य संख्या वाढविण्यासही नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या निर्णयामुळे भाजपचा नगराध्यक्ष असलेल्या नगरपालिकेत भाजपच्या सदस्य संख्येत भर पडेल.

नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकारही प्रदान करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियममध्ये सुधारणा करण्यात आली असून, नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबतचे विधेयक पारीत करण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत 161 नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत. नगराध्यक्ष थेट निवडून आल्यामुळे त्यांना काही अधिकार प्रदान करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षास देण्यात आला आहे.

नगराध्यक्षांचे अधिकार
- नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविणे
- उपनगराध्यपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी
- नगरसेवक या नात्याने उपनगराध्यक्ष पदासाठी मतदान
- उपनगराध्यक्षपदासाठी समसमान मते पडल्यास निर्णायक मत
- नगरसेवक म्हणून नोंद झाल्याने तौलनिक संख्याबळात सहभाग
- एका गटात स्वतःचा समावेश करून नामनिर्देशित सदस्य निवडीचा अधिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Critical capability to the mayor vote