तर, डान्सबारची छम छम देखील सुरू करणार का? भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

कृष्ण जोशी
Saturday, 19 September 2020

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरु करू शकते.

मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणारे ठाकरे सरकार उद्या पैशांसाठी डान्सबारही पुन्हा सुरु करू शकते. लॉटरी लागून सत्तेवर आलेल्या या सरकारकडून जुगार अधिकृत होण्याचीच अपेक्षा आहे, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

नानावटी हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार क्षमतेत वाढ; विशिष्ट अवयवांवरील उपचारासाठी ‘सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट’चे पथक

ऑनलाईन जुगाराला संमती देऊन गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा ठाकरे सरकारचा डाव आहे. पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणे कितीपत योग्य आहे हे तपासण्याकरिता वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली सरकारने समिती नेमली होती. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. राज्याला यातून करापोटी रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उदद्धस्त होणार आहेत, याचा विसर सरकारने पडू देऊ नये. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची असून राज्याचा करेतर महसूल वाढविण्यासाठी इतर चांगले मार्ग शोधता येतील. ते सोडून सरकार गरिबांना उद्धवस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे व यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते. लॉटरी लागून सत्तेत आलेले हे सरकार जुगाराला पाठींबा देणारच ना, असा टोला सुद्धा भातखळकर यांनी लगावला आहे.

जेएनपीटी बंदरात अडकला हजारो मॅट्रिक टन कांदा; निर्यातदारांना दररोज हजारोंचा फटका

‘नाईट लाईफ’वरही हल्ला
कोणाच्या तरी हट्टापायी ‘नाईट लाईफ’ सुरू करून मुंबईतील तरुणांना नशेच्या आहारी लावण्याचे पाप या सरकारने पूर्वीच केले आहे. राज्यात अंमली पदार्थ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, त्यावर नियंत्रण मिळवणे सोडून आता पैशासाठी जुगार अड्डे सुरु करण्याचा हे सरकार प्रयत्न करीत आहे. यापुढे पैशासाठी ठाकरे सरकार डान्सबार सुद्धा सुरु करतील असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criticism of BJP leader after the state government started online betting