नानावटी हॉस्पिटलच्या कर्करोग उपचार क्षमतेत वाढ; विशिष्ट अवयवांवरील उपचारासाठी ‘सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट’चे पथक

भाग्यश्री भुवड
Saturday, 19 September 2020

‘नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ने  कर्करोग उपचार केंद्रामध्ये विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक नेमून या केंद्राची क्षमता वाढवली आहे.

मुंबई : ‘नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ने  कर्करोग उपचार केंद्रामध्ये विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक नेमून या केंद्राची क्षमता वाढवली आहे.  कोरोना संकटाच्या काळात कर्करुग्णांच्या चाचण्या, त्यांचे निदान, उपचार आणि उपचारानंतरची काळजी या गोष्टींमध्ये विलंब होत असल्याने  रुग्णांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्या तक्रारींची दखल घेण्याच्या दृष्टीने नानावटी हॉस्पिटलमधील कर्करोग उपचार विभागात हे पथक नेमण्यात आले आहे.  

देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका मोडणार 5 हजार कोटींच्या ठेवी

रुग्णालयातील खास पथकात  डॉ. स्नेहल शाह (डोके व मानेचा कर्करोग), डॉ. संकेत मेहता (सायटोरिडक्टिव्ह सर्जरी व एचआयपीईसी), डॉ. चेतन आंचन (हाडांचा कर्करोग), डॉ. जय अनम (स्तनांचा कर्करोग) आणि डॉ. प्रवीण कम्मार (जीआय-कोलोरेक्टल) यांचा समावेश आहे. अचूक शस्त्रक्रियांसह हे पथक नवीन ‘दा विन्सी इलेव्हन रोबोटिक सर्जिकल सिस्टीम’च्या सहाय्याने एक दुर्मिळ ‘ऑन्को-रोबोटिक’ शस्त्रक्रिया कार्यक्रम सुरू करणार आहे.

ऑन्कोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. संजय दुधाट यांनी सांगितले की, नानावटी कर्करोग उपचार केंद्रामध्ये विविध अवयवांसंबंधित तज्ज्ञांचे पथक दाखल झाल्याने कर्करोगाच्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्याचे ध्येय अधिक बळकट होणार आहे.  रुग्णांचे अचूक निदान करून त्यांच्यावर उपचार करू. 

कोव्हिड उद्रेक आणि टाळेबंदी यांमुळे कर्करुग्णांचे निदान करण्यात व त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली, असे ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टरांचे निरीक्षण आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये कर्करोगाचे शस्त्रक्रियेद्वारे प्रभावीपणे उपचार करता आले असते. मात्र, आता या रुग्णांना केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी घ्यावी लागेल. या चिंताजनक परिस्थितीमुळे प्राथमिक अवस्थेतील कर्करोग पुढील पातळीवर जाईल किंवा गंभीर अवस्थेतील कर्करोग अगदी गंभीर स्थितीत जाईल आणि त्यामुळे कर्करुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागेल, अशी भिती या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना! शेलारांची आगपाखड

नजीकच्या काळात सर्व प्रकारच्या कर्करोगांचा नायनाट करण्यासाठी आणि त्यांस प्रतिबंध घालण्यासाठी नानावटी हॉस्पिटलचे आयकॉनिक कर्करोग उपचार केंद्र महत्वाची भूमिका बजावेल. या केंद्रात सध्या अत्याधुनिक ऑन्कोलॉजिकल तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये  दा विंसी इलेव्हन रोबोटिक सर्जिकल सिस्टीम्स आणि एचआयपीईसी तंत्रज्ञान (हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनिअल केमोथेरपी) या सुविधा उपलब्ध आहेत. 

 

आमचे अल्ट्रा-मॉडर्न तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा या शल्य चिकित्सा, वैद्यकीय, रेडिएशन आणि न्यूक्लियर ऑन्कोलॉजी यांमधील तज्ज्ञांच्या कामाला पूरक ठरणाऱ्या आहेत. नानावटी हॉस्पिटल कर्करूग्णांसाठी नवीन उपचार पद्धती शोधून, ते विकसित करून अधिक चांगले उपचार देण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवत आहे. 
- डॉ. वंदना पाकले,
व्यवस्थापकीय संचालिका, नानावटी रुग्णालय

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in cancer treatment capacity of Nanavati Hospital