पीकविमा कंपन्यांचे धाबे दणाणले..! Insurance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pikavima Yojana

पीकविमा कंपन्यांचे धाबे दणाणले..!

मुंबई : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठे संकट उभे कले असून तब्बल २५ लाख हेक्टरवरील खरीप पिके सपशेल नष्ट झाल्याचे चित्र आहे. यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून आता पिकविमा कंपन्यांसमोर नुकसान भरपाई देण्याचे मोठे आव्हान आहे.

‘गुलाब’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने थैमान घातले. महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे संपूर्णतः नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तब्बल १.२ कोटी शेतकरी प्रत्यक्ष बाधित झाले असून ‘पंतप्रधान पीकविमा योजने’चा हफ्ता भरलेल्या शेतकऱ्यांना सुमारे साडेसहा ते सात हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागेल असा अंदाज आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी २०२० मध्ये ५,८०१ कोटी रुपयांचा पीकविमा भरला होता. मात्र उत्तम पाऊस आणि दर्जेदार सोयाबीन उत्पादनामुळे या विमा कंपन्यांना जेमतेम ८२३ कोटी अर्थात १४ टक्के रक्कम विम्यापोटी द्यावी लागली. मात्र यंदा देशात सोयाबिनची सर्वाधिक लागवड महाराष्ट्रात झाली होती. पण या अतिवृष्टीने हे सर्व सोयाबीन वाया गेल्याने विमा कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.

नजर पंचनामे करा ...

पावसाचे पाणी प्रत्येक शेतात साठून असल्याने विहीत वेळेत प्रत्यक्ष पंचनामे करणे शक्य नसल्याचे सांगण्यत येते. त्यामुळे नजर पंचनामे करून पेरणी लायक क्षेत्राला सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील नेते रविकांत तुपकर यांनी तर आता पंचनामे कसले करता, असा सवाल करत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

पिकविम्याचे वास्तव ....

२०२० मधे १.२ कोटी शेतकऱ्यांनी ५,८०१ कोटी रूपयांचा हफ्ता भरून खरीप पिकाचा विमा उतरविला होता. पण नैसर्गिक संकट नसल्याने विमा कंपन्यांना जेमतेम १२.३ लाख शेतकऱ्यांना ८२३ कोटी रूपयांचा विमा द्यावा लागला. त्या अगोदर २०१८-१९ आणि २०१९-२० मधे बहुतांश भागात दुष्काळी स्थिती असल्याने ९४.५ टक्के शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला होता. यंदा ४० लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली असून त्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र पूर्णतः बाधित झाल्याचे प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांनी सरकारकडे दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

  • शेतीला फटका२५ लाख हेक्टरचीपेरणी बाधित

  • १ कोटीहून अधिक शेतकरी बाधित

  • सोयाबीन उत्पादकांना सर्वाधिक फटका

  • आर्थिक पॅकेजचे सरकारसमोर आव्हान

  • नजर पंचनामे करून सरसकट मदतीची मागणी

टॅग्स :crop insurance