काळजी घ्या ठाणेकरांनो! शहारातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 16 April 2020

  • ठाण्यात कोरोनाबाधितांची शंभरी पार
  • जिल्ह्यात 22 नवीन रुग्णांची नोंद, प्रशासनाची चिंता वाढली 
     

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 22 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 283 वर पोहोचला आहे. तर, ठाणे शहरात गुरुवारी 15 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली आहे. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

कल्याणमध्ये तीन, नवी मुंबईत दोन, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. गेल्या 24 तासात ठाण्यात 15 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर पोहोचली आहे. कल्याण, डोंबिवलीत तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे.  
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तेथील रुग्णांचा आकडा 55 वर पोहोचला आहे. तर, मीरा भाईंदरमध्ये एक रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा 50 वर पोहोचला आहे. तसेच ग्रामीण भागात देखील गुरुवारी एका नव्या रुग्णाची नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा सहावर पोहोचला आहे. तर, बदलापूर, अंबरनाथ आणि भिवंडीत गेल्या दोन दिवसात एकही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.

ठाण्यात 12 जणांची घर वापसी 
ठाणे शहरात आजपर्यंत एकूण 12 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून यापुढेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cross One hundred coronary patients in Thane