गावी जाण्याचे फॉर्म मिळवण्यासाठी परप्रांतीयांची ठीक-ठिकाणी गर्दी

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 3 May 2020

राज्य सरकारने गावाकडे जाण्यास परवानगी दिल्यानंतर प्रवासाकरिता देण्यात आलेले फॉर्म मिळवण्यासाठी शनिवारी नवी मुंबईत ठीक-ठिकाणी परप्रांतीयांनी गर्दी केली होती. परंतु हे फॉर्म नेमके कुठे मिळतात, याबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे सीबीडी-बेलापूर महापालिका विभाग कार्यालयाबाहेर आणि वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाबाहेरही परप्रांतीयांची गर्दी लोटली होती.

नवी मुंबई: राज्य सरकारने गावाकडे जाण्यास परवानगी दिल्यानंतर प्रवासाकरिता देण्यात आलेले फॉर्म मिळवण्यासाठी शनिवारी नवी मुंबईत ठीक-ठिकाणी परप्रांतीयांनी गर्दी केली होती. परंतु हे फॉर्म नेमके कुठे मिळतात, याबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे सीबीडी-बेलापूर महापालिका विभाग कार्यालयाबाहेर आणि वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाबाहेरही परप्रांतीयांची गर्दी लोटली होती.

धारावीत कोरोनाचा कहर! परिसरातील रुग्णांची संख्या 500च्या उंबरठ्यावर...

कोरोनाच्या वाढत्या संक्रमनानंतर राज्य सरकारने कामगार, मजूर अशा परराज्यात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे. त्याकरिता दिलेल्या नियमांप्रमाणे सर्व कागदपात्रांची पूर्तता झाल्यावर परवानगी देण्यात येणार आहे. प्रवासाची परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारने फॉर्मचे वाटप तसेच स्वीकृतीसाठी शहरी भागात पोलिस तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुद्धा नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु हे फॉर्म पोलिस ठाण्यातून दिले जाणार असून तिकडेच जमा करावे लागणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेतर्फे देण्यात आल्यावर गर्दी ओसरली.

ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात उच्चांकी रुग्णांची नोंद; वाचा आजची आकडेवारी

बेलापुरात रायगड भवनपर्यंत रांग
नवी मुंबई भाग महापालिका हद्दीत येत असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे. परंतु याबाबत स्पष्टता नसल्याने सकाळी कामगारांनी सीबीडी-बेलापूर विभाग कार्यालय तसेच इतर विभाग कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. बेलापूरमध्ये परप्रांतीयांनी फॉर्म घेण्यासाठी लावलेली रांग रायगड भवनपर्यंत गेली होती.

गावाला जाण्यासाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यातून अर्ज घ्यावेत. तसेच ते त्यांच्याकडेच जमा करायचे आहे. अशा नागरिकांना तपासून अहवाल देण्याचे काम महापालिकेचे डॉक्टर करतील.
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of migrants at many places to get the form to go to their village