esakal | Drugs Case: आर्यन खानसह ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan khan

Drugs Case: आर्यन खानसह ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Cordelia Cruise क्रूझवर पार्टी करण्यासाठी ड्रग्ज घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ड्रग्जप्रकरणी आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना एनसीबीने अटक केली होती. आता या प्रकरणाची सुनावणी विशेष एनडीपीएस कोर्ट करेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. आर्यन खानच्या वकिलांनी जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. या जामिनाबाबत एनसीबीला उद्या (शुक्रवारी) लिखित उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर जामिनाला आम्ही विरोध करणार, असं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं. आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणी उद्या (शुक्रवारी) होणार आहे. आजची रात्र आर्यन आणि इतर सात आरोपींना एनसीबी कार्यालयात घालवावी लागणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण १७ जणांना अटक केली आहे. ज्यात एका परदेशी नागरिकाचाही समावेश आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या चौकशीतून अचित कुमारचे नाव समोर आले. त्यामुळे या सर्वांची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद न्यायालयात एनसीबीकडून करण्यात आला. अचित कुमारला एनसीबीने ९ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून अचितनं नाव समोर आल्यानंतर एनसीबीने त्याच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी अचितच्या घरात एनसीबीला २.६ ग्रॅम गांजा सापडला होता.

आर्यनला क्रूझवर प्रतिक गाभाने बोलावलं होतं. प्रतिक हा अरबाज मर्चंटचा मित्र आहे. प्रतिकसोबत आर्यनची ड्रग्जबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर आर्यन अरबाजला भेटला आणि त्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी आर्यन, अरबाजला ताब्यात घेतलं. आर्यनच्या बॅगेत काही मिळालं नाही. व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आढळलं नाही. ते फुटबॉलविषयी चॅट करत होते, असा युक्तिवाद आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला.

हेही वाचा: वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

एनसीबी ही एक एजन्सी आहे. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. कोणाची पार्श्वभूमी काय आहे याचा विचार ते करत नाही. प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका एनसीबीच्या वकिलांकडून न्यायालयात मांडण्यात आली.

अटकेच्या दिवशी काय घडलं?

क्रूझवरच्या पार्टीला अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि त्याची मित्रमंडळी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीकडे होती. त्यानुसार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला होता. शनिवारी (२ ऑक्टोबर) आर्यन खान आणि अरबाझ प्रवेशद्वारावर आले. त्यावेळी अरबाजकडे सहा ग्रॅम चरस सापडले. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, पण त्याने ड्रग्जचं सेवन केलं होतं. त्यामुळे दोघांनाही क्रूझवर चढण्यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलं. तर मुनमुन हिच्या बॅगेत पाच ग्रॅम चरस सापडले. या तिघांसोबत त्यांचे मित्र क्रूझवरच होते. त्यांच्याकडेही काही ड्रग्ज मिळण्याची शक्यता असल्याने एनसीबीचे अधिकारी क्रूझवर चढले होते.

loading image
go to top