वीज सवलतीवरून टोलवाटोलवी  ग्राहकांचा अपेक्षाभंग; सरकारच्या निर्णयाकडे ग्राहकांचे डोळे 

वीज सवलतीवरून टोलवाटोलवी  ग्राहकांचा अपेक्षाभंग; सरकारच्या निर्णयाकडे ग्राहकांचे डोळे 


मुंबई : वीज कंपन्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांना पाठवलेल्या सरासरी वीज बिलामुळे ग्राहकांना शॉक बसला आहे. वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला होता. त्यानंतरही आता ऊर्जा विभागाकडून सवलतीबाबत टोलवाटोलवी सुरू आहे. सवलत मिळेल या आशेवर राज्यातील लाखो ग्राहकांनी अद्याप वीज बिल भरले नसून दरमहा या रक्कमेत वाढ होत असल्याने ग्राहक चिंतेत आहे. 

लॉकडाऊनच्या काळात विजेच्या मीटरचे रिडिंग अशक्‍य असल्याने ग्राहकांना तीन महिन्यांची सरासरी बिले पाठविण्यात आली. प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा ही बिले कमी होती. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रिडिंग घेऊन बिले आली तेव्हा अनेकांना धक्का बसला. याविरोधात नागरिकानी तीन टप्प्यात बिल भरणा आणि एकत्र बिल भरल्यास दोन टक्के सवलत देण्यात आली. मात्र, लोकांचा रोष कमी झाला नाही. त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार बिलांमध्ये सवलत देण्यासाठी काही दोन - तीन प्रकारच्या पर्यायांचा प्रस्ताव तयार ऊर्जा विभागाने तयार केला. या सवलतींबाबतचे सुतोवाचही उर्जामंत्र्यांकडून केले जात होते. त्यापोटी येणारी सुमारे दोन हजार कोटींची तूट महावितरणला झेपणारी नसल्याने ती राज्य सरकारच्या तिजोरीतून भरून काढण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या प्रस्तावाला वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी नकार डोक्‍याने अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. 

घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यासाठी सरकारकडून साडे चार हजार कोटींचे अनुदान मिळावे, असा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पाठविण्यात आला आहे, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देता येईल, असे ऊर्जा विभागातील सूत्रांनी सांगितले. तसेच ऊर्जा विभागाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी नेमलेली समिती सरकारवर आर्थिक बोजा न पडता ऊर्जा कंपन्यांवर हा भार कसा टाकता येईल, याचा अभ्यास करत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या टोलवाटोलवीत ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय रखडला आहे. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

मे महिन्यात एकदम 12 हजार बिल आले. एरवी सरासरी बिल दीड ते 2 हजाराच्या घरात बिल येते. घरात तीन फॅन, वशिंग मशीन, मिक्‍सर, एलडी लाईट 3 आहेत. लॉकडाउन मध्ये बिल भरले तरीही 12 हजार बिल आले आहे. बिल भरणे शक्‍य नसल्यामुळे व्याज लागून आता बिल 20 हजार रुपये आले आहे. सरकार दिलासा देईल असे वाटत होते, पण सरकारने अपेक्षाभंग केला आहे. 
- संजय घोलप -
महावितरण ग्राहक, वाशी 

सरकारने स्वतः केलेली घोषणा स्वतःच पायदळी तुडवली आहे. राज्यातील वीज ग्राहकांच्या भावनांशी सरकार खेळत आहे. सरकार या प्रश्नांवर संवेदनशील नाही. केरळ, राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने घरगुती वीज ग्राहकांना 50 टक्के वीज सवलत दिली आहे. पण राज्य सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही. लॉकडाउन मध्ये लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांना वीज बिल भरणे अशक्‍य आहे. यामुळे त्यांना सवलत देणे आवश्‍यक आहे. सरकार कर्ज घेऊन नागरिकांना दिलासा देऊ शकते. पण सरकारला हे करायचे नसल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. 
- प्रताप होगडे -
वीज तज्ज्ञ 

गेल्या सहा महिन्यांत अनेकांना वीजबिलांनी मोठा शॉक दिला. महावितरणचे कर्मचारी कधी आले आणि रिडिंग घेऊन गेले हेही आम्हाला समजले नाही; मात्र बिल सर्वांनाच भरमसाट आले. मला आताच नाही तर यापूर्वीही भरमसाट बिल आले आहे. मी वारंवार त्याबाबत तक्रार केली आहे. त्यावर त्यांचे ठराविक उत्तर असते, आम्ही मीटरप्रमाणे बिल पाठविले आहे. कोरोना काळात मला तब्बल वीस हजार रुपये बिल आले आहे. मी त्यांना मेलवर तक्रार केली; परंतु पुन्हा तेच त्यांचे उत्तर. नाईलाजास्तव मला बिल भरावे लागले. पुन्हा तक्रार केली तरी तेच उत्तर मिळते. बिल न भरल्यास वीज कापली जाते. शेवटी आपण करणार तरी काय? 
---- 
- तृप्ती तोरडमल,
अभिनेत्री

उर्जामंत्र्यांचे अजब उत्तर 
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीज सवलत कधी मिळणार याची विचारणा केली. परंतु त्यांनी तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा करा, असा अजब सल्ला राऊत यांनी दिल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

महावितरणची 5 हजार 742 कोटींवर थकबाकी 

लॉकडाऊनचा फटका महावितरणच्या बिल वसुलीलाही बसला आहे. यंदा महावितरणच्या थकबाकीत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल ते आँगस्ट, 2020 या पाच महिन्यांत ही थकबाकी तब्बल 5 हजार 742 कोटींवर झेपावली आहे. त्यात सर्वाधिक 3 हजार 521कोटींची थकबाकी ही घरगुती वीज ग्राहकांकडे आहे. सरकारने केलेली आणि प्रत्यक्षात न आलेली वीज बिल माफीची घोषणा हे सुध्दा त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com