Cyrus Mistry Death : मिस्त्रींनी सीटबेल्ट लावला नव्हता?

पोलिस तपासातील माहिती; पुलाजवळ सुटले नियंत्रण
 Cyrus Mistry Accidental Death
Cyrus Mistry Accidental Death sakal

मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे पालघरमधील चारोटी परिसरात सूर्या नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात रविवारी (ता. ४) निधन झाले होते. मिस्त्री यांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

दरम्यान, चारोटी तपासणी नाक्यावरील ‘सीसीटीव्ही’नुसार मिस्त्री यांची मोटार तेथून दुपारी २.२१ वाजता निघाली. तेथून २० किलोमीटर अंतरावरील सूर्या पुलावर येण्यास तिला २.३० वाजले. हा तपशील खरा असल्यास नऊ मिनिटांत २० किलोमीटर अंतर पार करणारी ही मोटार ताशी १३३ किलोमीटर या प्रचंड वेगाने धावत होती, असेही ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे.

‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री तसेच जहांगीर पंडोल यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. सायरस व जहांगीर हे मोटारीच्या मागील सीटवर बसले होते. त्या दोघांनीही सीटबेल्ट लावले नव्हते. अपघातग्रस्त मोटार अनायता पंडोल चालवीत होत्या, तर त्यांचे पती दरायस पंडोल त्यांच्या शेजारी बसले होते; मात्र त्या दोघांनीही सीटबेल्ट लावले असल्यामुळे ते बचावले. अपघातावेळी ही मोटार सुमारे सव्वाशे किलोमीटर प्रतितास वेगाने जात होती तसेच पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला असावा, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. या शक्यतेबाबत पोलिस तपास करत आहेत.

अपघात झालेल्या मोटारीला पुढे दोन एअर बॅग होत्या. अपघात झाल्यानंतर त्या कार्यान्वित झाल्याने पुढील सीटवर बसलेले दोघेही जखमी झाले; मात्र मागे बसलेले सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांनी सीटबेल्ट लावले नसल्यामुळे मागच्या बाजूच्या एअर बॅग उघडल्या नाहीत. अपघाताच्या हादऱ्याने या दोघांचीही डोकी पुढील सीटवर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

आज अंत्यसंस्कार

मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. ६) वरळीच्या स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल यांच्या मृतदेहाचे जे.जे. रुग्णालयात आज शवविच्छेदन झाले. अपघातात जखमी डॉ. अनायता पंडोल आणि दरायस पंडोल यांना एच.एन. रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात आले.

चुकीच्या दिशेने ओव्हरटेक?

1 मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही मार्गिका प्रत्येकी तीन पदरी असल्या तरी पुलावरील मार्गिका दोन पदरी आहेत. त्यामुळे ओव्हरटेक करताना तसेच लेन बदलताना अंदाज चुकल्याने मोटार पुलाच्या दुभाजकाला धडकली.

2 पुढील वाहनाला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा, असेही पोलिसांना वाटते आहे.

3 मागील सीटवर बसलेल्या दोघांनीही सीटबेल्ट लावले नव्हते, असे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धावून आलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सीटबेल्ट हवाच

सरकारच्या नियमानुसार आता मोटारींच्या मागील सीटवर बसलेल्यांना सीटबेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे; मात्र बहुतांश प्रवासी तो लावत नाहीत त्यामुळे अपघात झाल्यावर ते वेडेवाकडे फेकले जाऊन त्यांना हादरा बसतो किंवा त्यांना मोठी दुखापत होते. या प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो. मिस्त्री यांच्या अपघातात असेच झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मोटारीच्या डाव्या बाजूच्या पुढील भागाने पुलाच्या दुभाजकाला जोरदार धडक दिल्यावर वेगामुळे ही मोटार गिरक्या घेत भरकटली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

समाज माध्यमांवर चर्चा

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर समाज माध्यमांवर या अपघातासंबंधी सीटबेल्ट, अतिवेग, ओव्हरटेकिंग आदींची चर्चा सुरू होती. सीटबेल्ट न लावल्यास एअरबॅग उघडत नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट लावणे किती आवश्यक आहे, याबाबतही माहिती सर्वत्र दिली जात होती. तसेच कितीही चांगली आणि सुरक्षिततेचा दावा करणारी गाडी असली तरी सीटबेल्ट लावले नाही, सुरक्षा उपाययोजनांचे पालन केले नाही, तर सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या मोटारी उपयोगाच्या ठरत नाहीत, अशीही चर्चा सुरू होती.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com