यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार जल्लोष आणि थरांचा थरार. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dahihandi on Krishna Janmashtami

यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार जल्लोष आणि थरांचा थरार.

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शुक्रवार 19 ऑगस्ट 20022 रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.

गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही दहीहंडी फक्त पारंपारिक पध्दतीने परंपरा खंडित न करता साजरी करण्यात आली. परंतु या वर्षी पुन्हा धर्मवीरांची ही मानाची हंडी त्याच उत्साहात.. जल्लोषात साजरी होणार आहे. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघेसाहेबानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. ही पुन्हा एकदा त्याच दिमाखात यंदा अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे.

हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थराकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे, त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1,00,000/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12,000 हजार, सहा थरांसाठी 8,000 हजार, पाच थरांसाठी 6000 हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5000 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणान्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे.

हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख रमेश देती, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख), टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

Web Title: Dahi Handi 2022 Mumbai And Thane Krishna Janmashtami

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..