#विधानसभा_2019 : ...तर दहिसरमध्ये लढत सेना-भाजप युतीतच

सचिन सावंत
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या दहिसर मतदारसंघात युती झाली तर ठीक नाहीतर भाजप-शिवसेनेतच लढाई रंगणार आहे...

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ २०१४ च्या निवडणुकीत अंतर्गत वादामुळे भाजपच्या ताब्यात गेला. आताही या मतदारसंघात शिवसेनेचेच नगरसेवक जास्त आहेत. मात्र आमदार भाजपचा आहे. त्यामुळे युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेकडे येणार की भाजपकडे, यावरूनच वाद होण्याची शक्‍यता आहे. युती न झाल्यास शिवसेना-भाजपमध्ये लढाई होणार आहे. काही झाले तरी या मतदारसंघातून भाजप किंवा शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार, हे निश्‍चित आहे.

मुंबईचे उत्तरेकडील टोक असलेला दहिसर मतदारसंघ मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा बनलेला आहे. सर्वाधिक मतदार मराठी असले तरी त्याखालोखाल गुजराती आणि उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. २००९ मध्ये पहिल्यांदा हा मतदारसंघ तयार झाला. त्या वेळी शिवसेनेचे विनोद घोसाळकर अगदी सहज निवडून आले होते. दीड दशकापासून दहिसर-मागाठाणे परिसरात घोसाळकर यांचा एकछत्री अंमल होता; मात्र २०१४ च्या निवडणुकीत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ आणि शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी घोसाळकरांविरोधात बंड केले. डॉ. राऊळ मनसेमधून निवडणूक लढल्या. म्हात्रे यांनी भाजपच्या मनीषा चौधरी यांचा प्रचार केला. या मतदारसंघातील पाचकळशी, आगरी व कोळी मते चौधरी यांच्याकडे गेली. त्याचा फटका घोसाळकर यांना बसला. तब्बल ३५ हजारांहून अधिक मतांनी चौधरी यांनी त्यांचा पराभव केला. इतर पक्ष त्यांच्या आसपासही नव्हते.

सध्या दहिसर मतदारसंघात शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत आणि दोन भाजपचे. त्यामुळे युतीच्या चर्चेच्या वेळी शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. जर युती तुटली तर शिवसेना-भाजपमध्येच लढाई होणार आहे. दहिसर मतदारसंघासाठी काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही. 
काँग्रेसच्या शीतल म्हात्रे या मतदारसंघातून निवडणुक लढवू शकतील; मात्र एक-दोन प्रभाग सोडले तर काँग्रेसचा प्रभाव संपूर्ण मतदारसंघावर पडणार नाही. त्यामुळे युती झाल्यास त्यांचा उमेदवार हमखास निवडून येणार. तो किती मताधिक्‍य मिळवणार हाच प्रश्‍न आहे.  या वेळी शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे भाजपला २०१४ प्रमाणे यंदाची निवडणूक सोपी नाही.

पाणी आणि वाहतुकीचा प्रश्‍न
दहिसर मतदारसंघात पाण्याचा आणि वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्‍न आहे. ६०-७० च्या दशकात हे उपनगर उभे राहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत असला तरी शहराच्या गोंगाटापासून हा मतदारसंघ खूपच दूर आहे. खा;सकरून नोकरदारवर्ग या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पश्‍चिम द्रुतगर्ती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि पूर्वेला अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या कोंडीचा मोठा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. समस्या असल्या तरी युतीच्या बाजूने मतदार कौल देणार, हे निश्‍चित आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मते 

 • मनीषा चौधरी (भाजप)    ७७२३८
 • विनोद घोसाळकर (शिवसेना)    ३८६६०
 • शीतल म्हात्रे (काँग्रेस)    २१,८८९
 • डॉ. शुभा राऊळ (मनसे)    १७,४३९
 • हरीश शेट्टी (राष्ट्रवादी काँग्रेस)    ९९५

भाषिक मतदारांची टक्केवारी 

 1. मराठी    २७ ते २८ टक्के 
 2. गुजराती, मारवाडी आणि जैन    २४ ते २५ टक्के 
 3. उत्तर भारतीय    १५ ते १६ टक्के 

एकूण मतदार    २५०६३५

 • महिला    ११५९२३
 • पुरुष    १३४६७६
 • इतर    ३६
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Dahisar Assembly constituency battle between Shiv Sena-BJP alliance