esakal | दहिसरमध्ये आगळेवेगळे एनर्जीपार्क; अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे उभारणी
sakal

बोलून बातमी शोधा

Energy Park

दहिसरमध्ये आगळेवेगळे एनर्जीपार्क; अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे उभारणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : देशातील किंबहुना जगातील पहिलेवहिले असे वेगळेच एनर्जी पार्क (Energy Park) दहिसरमध्ये (dahisar) येत्या वर्षभरात साकारणार आहे. या पार्कमध्ये पर्यटकांकडून (tourist) उर्जानिर्मिती (Energy generation) तर केली जाईलच पण उर्जाबचत, अपारंपारिक स्वच्छ उर्जा यांचे धडे (lessons) दिले जातील. विशेष म्हणजे यासाठी करदात्यांचा एक रुपयाही खर्च होणार नाही. शिवसेना नेते व म्हाडा सभापती विनोद घोसाळकर (vinod ghosalkar) यांच्या संकल्पनेतून अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईतर्फे (AEML) सीएसआर फंडातून (CSR) हे पार्क उभारले जाईल.

हेही वाचा: जव्हारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा; लसीचा मात्र तुटवडा

बांधकाम पूर्ण झाल्यावर हे पार्क महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सकाळ ला दिली. याबदल्यात एईएमएल ला डीसीआर मधील तरतूदींनुसार भूमिगत सबस्टेशनसाठी जागा दिली जाईल. नुकतेच एईएमएल चे सीईओ कंदर्प पटेल तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजुरी दिली. यावेळी त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन केले जाईल.

शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रयत्नांनी हे एनर्जी पार्क उभारले जाईल. त्यासाठीचा अंदाजे पंधरा कोटींचा खर्चही एईएमएल करणार आहे. अशा प्रकारचे व एवढे मोठे एनर्जीपार्क जगात कोठेही नसल्याचा दावा अभिषेक घोसाळकर यांनी केला. या पार्कमध्ये वेगळ्या उपकरणांवर चालून किंवा सायकल चालवून उर्जानिर्मिती होईल. तेथे जलविद्युत, पवनउर्जा, सौरउर्जा निर्मिती करणारी छोटी मॉडेल ठेवलेली असतील. त्याखेरीज अणुउर्जा, औष्णिकउर्जा, बायोगॅसपासून उर्जानिर्मितीची माहिती देणारी मॉडेलही तेथे असतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांना वीजनिर्मिती प्रक्रियेचे, वीज वाहून नेण्याच्या प्रक्रियेचे तसेच त्यातील सुरक्षा व्यवस्थेचे ज्ञान मिळेल.

त्याखेरीज येथे मुलांना खेळण्यासाठी उद्यान, हॉटेल, माहितीसाठी संदर्भविभाग आदी बाबीही असतील, असेही त्यांनी सांगितले. आता पर्यावरणमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने एक ते दोन आठवड्यांत सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जाईल. महिन्याभरात इतर सर्व मान्यता मिळाल्यावर ऑक्टोबरमध्ये कामाला सुरुवात होईल. आता टेंडर काढणे, निधी मंजूर करणे व तो मिळणे या बाबींचे अडथळे नसल्याने वर्षभरात काम पूर्ण होऊन उद्यान खुले होईल, अशी अपेक्षा असल्याचेही घोसाळकर म्हणाले.

loading image
go to top