२ ते २४ हजारात विकला जातोय तुमचा डेटा, लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांचं कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

डाटा चोरी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून 2 आरोपीना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime : २ ते २४ हजारात विकला जातोय तुमचा डेटा, लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांचं कृत्य

मुंबई - डाटा चोरी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून 2 आरोपीना अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांचा वैयक्तिक डेटा पुरवणारे वेब पोर्टल चालवल्याचा आरोप आहे. राहुल एलिगाटी (28) आणि निखिल एलिगाटी (25) अशी अटक आरोपींची नावे असून ते मुंबईत मुलुंड येथे वास्तव्यास आहेत. दोन्ही आरोपी नात्याने भाऊ असून दोघेही पदवीधर आहेत. हा डेटा प्रामुख्याने कर्ज वसुली एजंटना विकला गेला. वेब पोर्टलकडून फी आकारण्यात आली. मासिक 2,000 रुपये, अर्धवार्षिक सदस्यता 12,000 रुपये आणि वार्षिक 24,000 रुपयांच्या किमतीवर डाटा विकला गेला.

पहिल्या कोविड लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा निखिलकडे नोकरी नव्हती, तेव्हा त्याने आणि त्याच्या भावाने डेटा मिळवला आणि दोन वेबसाइट सुरू केल्या. आरोपींनी तयार केलेल्या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर, फक्त सर्चमध्ये व्यक्तीचे नाव टाकून, संबंधित व्यक्तींचे वर्तमान आणि पूर्वीचे सेलफोन नंबर, आधार कार्ड क्रमांक, पत्ता, जन्मतारीख आणि कुटुंबातील सदस्यांचे फोन नंबर यासारखे तपशील मिळू शकत होते.

निखिलने यापूर्वी कर्ज वसुली एजंट म्हणून काम केले आहे, ज्याद्वारे त्याला कर्ज बुडवणाऱ्यांचा कंपन्यांच्या डाटा आणि त्याच्या स्त्रोतां बद्दल माहिती होती. आरोपी इतक्या संवेदनशील डेटाबेसमध्ये कसे प्रवेश मिळवू शकला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

आरोपींनी काही सरकारी वेबसाइट हॅक केली होती का किंवा अशा ठिकाणच्या एखाद्या आतल्या व्यक्तीने संवेदनशील डेटा दिला होता का हे शोधण्यासाठी पोलीस दोघांची चौकशी करत आहोत. आरोपीने हा डेटा डार्क नेटमधून विकत घेतला आहे की नाही, या दृष्टीने तपास पोलीस करत आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही भावांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.