दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीची 500 कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त

अनिश पाटील
Thursday, 19 November 2020

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या वरळी येथील राबिया मेन्शन, मरियम लॉज आणि सीव्ह्यू या तीन इमारती केंद्रीय यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या वरळी येथील राबिया मेन्शन, मरियम लॉज आणि सीव्ह्यू या तीन इमारती केंद्रीय यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, 1985 अंतर्गत  9 नोव्हेंरला आदेश जारी करण्यात आले होते. त्याअंतर्गत या तीन मालमत्तांबाबत झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली मालमत्तांची किंमत 500 कोटींहून अधिक आहे. यापूर्वीच मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांशी संबधित 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर वर्षभरात टाच आणण्यात आली होती.

सक्त वसूल संचलनालयाकडे(ईडी) दाखल गुन्ह्यांत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. त्या अंतर्गत या मालमत्तांचा ताबा स्मगलर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीप्युलेटर्स ऑथोरिटीने (सफेमा) घेतला आहे. या इमारतीवर एका ट्रस्टने 2005 मध्ये दावा केला होता. मिर्चीने या मालमत्तांचे पूर्ण पैसे भरले नसल्यामुळे त्यांचा ताबा मिर्चीला देण्यात आला नव्हता, असा दावा ट्रस्टकडून करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यातील या मालमत्ता सोडवण्यात आल्या होत्या. पण 6 नोव्हेंबर, 2019 मध्ये ईडीने याप्रकरणी सखोल तपास करून या मालमत्ता इक्बाल मिर्चीच्याच असल्याचे पुरावे सादर केले होते. पीएमएलए कायद्या अंतर्गत रावण्यात आलेल्या शोध मोहिमांमार्फत हे पुरावे गोळा करण्यात आले होते. त्यात संपूर्ण रक्कम भरल्याच्या पावत्या, पासबुकमधील व्यवहार, इक्बाल मेमन उर्फ मिर्चीला मालमत्तांचा ताबा हस्तांतरण पत्र, आयकर विभागाकडे मालमत्तेच्या विक्रीबाबत भरण्यात आलेल्या कर आदी महत्त्वपूर्ण पुरावे ईडीच्या हाती लागले होते. त्याच्या आधावर ट्रस्ट करत असलेला दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते.

भारतातील गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशांतून इक्‍बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये 25 मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 16 मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत. याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत.

अधिक वाचा-  उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार, मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम

साफेमा या केंद्रीय यंत्रणेद्वारे  मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलावही 10 नोव्हेंबरला आला होता. पण त्यावेळीही या मालमत्तेसाठी कोणीही बोली लावली नाही. गेल्या वर्षी सफेममार्फत या मालमत्तेचा लीलाव करण्यात आला होता.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी 45 लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन कॉ. हा.सो. मध्ये 501 आणि 502 हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ 1200 चौ.फुट आहे. मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुलं आसीफ आणि जुनैद यांच्यासह 13 जणांवर ईडीने डिसेंबर,2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरण आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून मिर्चीच्या सुमारे 800 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dawood trustworthy person Iqbal Mirchi assets worth over Rs 500 crore seized


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dawood trustworthy person Iqbal Mirchi assets worth over Rs 500 crore seized