वाढत्या संसर्गामुळे पॅरोल अर्जावर तातडीने निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे कारागृह प्रशासनांना निर्देश

सुनिता महामुणकर
Monday, 7 September 2020

राज्यभरातील कारागृहात असलेल्या कैद्यांच्या पॅरोल अर्जावर पंधरा दिवसांत निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सर्व कारागृह प्रशासनांना दिले आहेत.

मुंबई : राज्यभरातील कारागृहात असलेल्या कैद्यांच्या पॅरोल अर्जावर पंधरा दिवसांत निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सर्व कारागृह प्रशासनांना दिले आहेत.

राज्यात कोरोना संसर्गात पुन्हा वाढ झाली आहे. कारागृहात याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अनेक कैद्यांनी पॅरोल मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. साधारणत: असे शंभरहून अधिक अर्ज प्रत्येक कारागृहात प्रलंबित आहेत. या अर्जावर तातडीने आणि निश्चित कालावधीमध्ये सुनावणी घेतल्यास त्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. 

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

औरंगाबाद उच्च न्यायालयात पॅरोल मंजूर करण्यात विलंब होत आहे, असे निदर्शनास आणणाऱ्या तेरा नातेवाईकांच्या स्वतंत्र याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर नुकतीच न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. तातडीने पैरोल मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले निकष याचिकादार पूर्ण करीत आहेत. मात्र अद्यापही यावर निर्णय घेण्यात आलेला नाही, असे याचिकादारांकडून सांगण्यात आले. 

वरळी येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

विलंब करणे अयोग्य!
राज्य सरकारने पॅरोलबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार संबंधित प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यायला हवा. त्यासाठी विलंब करून प्रक्रिया लांबविणे योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप होणार नाहीत आणि पारदर्शकताही राखली जाईल, असेही खंडपीठ म्हणाले.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decide immediately on parole application due to increasing infection; High Court directs prison administrations