
मुंबईत तापमानात घट
मुंबई - राज्यातील काही भागात उष्णतेची लाट उसळली असली तरी मुंबईला मात्र त्याची झळ बसलेली नाही. उलट मुंबईतील कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. मुंबईत रविवारी कुलाबा ३३.४ तर सांताक्रूझ ३४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील कमाल तापमानात आज अनुक्रमे १.८ व १.३ अंश सेल्सियसची घट झाली. त्यात दुपारी वाऱ्याची हलकी झुळूक सुटल्याने उन्हाची काहिली काहीशी कमी झाल्याची दिसली. तापमानातील आर्द्रता कुलाबा ८५ तर सांताक्रूझ ७३ टक्के नोंदवण्यात आली. विदर्भात मात्र पुन्हा उष्णतेची लाट परतली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्याने सोमवारपासून कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागातील तापमान वाढल्याचे दिसत आहे. अनेक भागातील कमाल तापमान ४५ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. पुढील २ ते ३ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून काळजी घेण्याची आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या सात जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज आहे. देशातील अनेक राज्यांमधील तापमानात वाढ होत आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात असलेली उष्णतेची लाट विदर्भातही पसरली आहे. या लाटेमुळे नागपूरसह सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होऊन, उकाडा व चटकेही वाढले आहेत. रविवारी अपेक्षेप्रमाणे पाऱ्याने उसळी घेतली. चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात जवळपास दीड अंशाची वाढ होऊन पारा ४३ अंशांवर गेला. ब्रम्हपुरीचाही पारा दोन अंशांनी वाढला. येथे नोंदविण्यात आलेले ४४.९ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात सर्वाधिक ठरले. त्याखालोखाल तापमानाची नोंद अकोला (४४.४ अंश), चंद्रपूर (४४.२ अंश), वर्धा (४४.२ अंश) आणि अमरावती (४४ अंश) येथे करण्यात आली. इतरही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवले. हवामान विभागाने सोमवारपासून नागपूर, अकोला, चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिल्याने पारा पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात कमाल तापमान ४५ ते ४६ अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ११ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
तीन अंशांनी तापमान वाढणार
पुढील तीन दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ११ दरम्यान पश्चिम राजस्थान, ९ ते ११ पर्यंत पूर्व राजस्थान; ८ व ९ रोजी पश्चिम मध्य प्रदेश, १० व ११ मे रोजी दक्षिण पंजाबमध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे.
Web Title: Decrease In Temperature In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..