ठाणे जिल्ह्यात मागील आठ दिवसात रुग्णांच्या संख्येत घट

राहुल क्षीरसागर
Monday, 26 October 2020

ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, मागील आठ दिवसापासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईः ठाणे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, मागील आठ दिवसापासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दीड ते दोन हजाराच्या आसपास आढळून येणाऱ्या रुग्णांची मागील आठ दिवसापासून हजारच्या खाली घसरली आहे. साडेसात हजार रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मार्च महिन्यापासून ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. त्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील रुग्णांची संख्या वाढतीच असल्याचे दिसून आले. मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत जिल्ह्यातील 11 लाख 32 हजार 875 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 9 लाख 23 हजार 991 जणांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला असून दोन लाख सहा हजार 306 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एक लाख 89 हजार 78 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, 5 हजार 214 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध महापालिकांच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येत मागील आठ दिवसापून घट होत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज जिल्ह्यात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दीड ते दोन हजाराच्या घरात होती. मात्र, 17 ऑक्टोबर पासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत, बाधित रुग्णांची संख्या 800 ते एक हजाराच्या आत आली आहे. या घटत्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे जिल्ह्यावासियांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्येत घट होत असल्याचे दिसून येत असताना, या आजाराने बाधित होऊन त्यात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये सुरुवातीला कोरोना आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 40 ते 45 च्या घरात पोहोचली होती. मात्र, आता, ती 25 ते 15 वर आली आहे. 

17 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत बाधित रुग्णांची संख्या

दिनांक             रुग्णांची संख्या

  • 17 ऑक्टोबर        1127
  • 18 ऑक्टोबर        1083
  • 19 ऑक्टोबर        983
  • 20 ऑक्टोबर        898
  • 21 ऑक्टोबर        1021
  • 22 ऑक्टोबर        859
  • 23 ऑक्टोबर        900
  • 24 ऑक्टोबर        872

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Decrease in number of patients Thane district in last eight days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in number of patients Thane district in last eight days