esakal | दीपाली चव्हाण आत्महत्या: "शिवकुमारला पाठीशी घालणाऱ्या रेड्डींना सहआरोपी करा"
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali-Chavan

केवळ निलंबन पुरेसं नसल्याचं भाजपा प्रदेश महिला मोर्चाचं मत

दीपाली चव्हाण आत्महत्या: "शिवकुमारला पाठीशी घालणाऱ्या रेड्डींना सहआरोपी करा"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटले आहेत. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांच्या मृत्यूला शिवकुमार हे अधिकारी सर्वस्वी जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवकुमारला अटक करण्यात आली. मात्र, या शिवकुमारवर कारवाई न करणाऱ्या अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून घेऊन अन्य निःष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रविवारी केली होती. त्यानंतर आता, या प्रकरणात रेड्डी यांना सहआरोपी करावे व त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चाने केली आहे.

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीसाठी समितीची घोषणा

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील निलंबन कारवाई पुरेशी नसून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे. तसेच, त्यांची चौकशी केली जावी. दीपालीच्या मारेकऱ्यांना तातडीने पकडले जावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडे व पोलिसांकडे आग्रही भूमिका घेण्यात आली. शिवकुमार व रेड्डी या दोघांनाही निलंबित करावे या मागणीसाठी आंदोलनही केले होते. महिला मोर्चाच्या दबावामुळे रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र ही कारवाई पुरेशी नसून त्यांना दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात सहआरोपी केले जाणे आवश्यक आहे. तसेच त्यांची शासनाकडून विभागीय चौकशी करणे गरजेचे आहे. या मागण्या मान्य न केल्यास महिला मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा उमा खापरे यांनी दिला.

"दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार हे एकटे जबाबदार नसून दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता  शिवकुमार यांना वेळोवेळी पाठिशी घालणारे रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून  निलंबित करून अटक करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीकडून वारंवार केली जात आहे. मात्र, सरकारने रेड्डी यांची बदली करून त्यांना अभयच दिले आहे. दीपाली चव्हाण यांची या व्यवस्थेने हत्या केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरु झाले आहेत. शिवकुमार यांची तीन दिवसाची पोलीस कोठडी सोमवारी संपल्यावर त्यांच्या जामीनासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. त्यामुळे  शिवकुमारसह रेड्डी यांच्यावरही 302 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी", अशी मागणी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती.

loading image