गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीसाठी समितीची घोषणा

parambir-singh.jpg
parambir-singh.jpg

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. गृहमंत्री देशमुखांनी NIA च्या अटकेत असलेला API सचिन वाझेना महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे पत्र माध्यमांमध्ये लीक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 

विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती. दरम्यान आता परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमुर्तींची एक सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती सहा महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करेल. 

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी सापडली. त्यानंतर काही दिवसांनी ही कार ज्यांच्याकडे होती, त्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी एनआयएने API सचिन वाझेला या प्रकरणात अटक केली. 

या सर्व प्रकरणात मलिन झालेली प्रतिम सावरण्यासाठी तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. एकप्रकारे वाझे प्रकरणासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट लेटरबॉम्बच फोडला. ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com