धक्कादायक! एसटीच्या तोट्यात आणखी 802 कोटींची वाढ होणार

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

  • "एसटी'च्या प्रवासी संख्येत सुमारे 5.5 टक्‍याने घट;
  • अनियोजित कारभाचा फटका 

मुंबई : "एसटी' महामंडळाचा 2019-20 या आर्थिक वर्षांत 5000 कोटींचा संचित तोटा होता. त्यानंतर आता 2020-21 या आर्थिक वर्षात यात 802 कोटींची वाढ होऊन तो 6,155 कोटींवर जाणार असल्याचा अंदाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आला. त्यामुळे "एसटी'चे चाक आणखी खोलात जाण्याची शक्‍यता आहे. 

तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

महामंडळाचे गेल्या वर्षात सुमारे 8,745 कोटींचे महसुली उत्पन्न झाले. त्या तुलनेत सुमारे 9,548 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात सुमारे 802 कोटींचा तोटा पुन्हा वाढणार आहे. गेल्या वर्षात राज्य सरकारच्या अनुदानातून 700 नवीन बस खरेदी करण्यात आल्या; तर 1,814 जुन्या बस गाड्यांची पुनर्बांधणी आणि 600 नवीन चॅसिस खरेदी करण्यात आल्या. तसेच राज्यातील 14 बस स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार होते; मात्र त्यापैकी पाच बस स्थानकांचे कंत्राट मंजूर झाले असताना सध्या तरी तीनच ठिकाणी काम सुरू आहे. बसच्या फेरीचा वक्तशीरपणा तपासण्यासाठी "व्हीटीएस प्रणाली'चा वापर करण्यात आला आहे; मात्र यातून कोणताही आर्थिक फायदा "एसटी'ला झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - ससून डॉकचा मत्स्यव्यवसाय संकटात 

"एसटी'च्या प्रवासी संख्येत सुमारे 5.5 टक्‍यांनी घट झाली आहे. "एसटी' कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कंत्राट, ब्रिस्क कंपनीला दिलेले स्वच्छतेचे कंत्राट, रोल्टा कंपनीला दिलेले ई-आरपीचे कंत्राट, व्हीटीएस प्रणाली अशा कामांवर नाहक महामंडळाचा खर्च झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षातसुद्धा एसटीवर 802 कोटींचा भार पडून सुमारे 6,000 कोटींपेक्षा जास्त संचित तोटा एसटीचा वाढणार आहे. 
---- 
वर्ष - संचित तोटा - वार्षिक तोटा 
2014-15 - 1685 - 391 
2015-16 - 1807 - 121 
2016-17 -2330 - 522 
2017-18 - 3663 - 1578 
2018-19 - 4549 - 886 
2019-20 - 5353 - 803 
2020-21 - 6155 - 802 

एसटी तोट्यात आहेच. त्यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. ज्या ज्या गोष्टींमध्ये एसटीचे नुकसान झाले आहे, त्या सर्व गोष्टी बदलणार आहे. त्यासह ज्या मार्गांवरील गाड्या रिकाम्या धावतात, अशा ठिकाणी नवे मार्ग शोधले जाणार आहेत. प्रवासी संख्या कशी वाढवता येणार त्यावर भर दिला जाणार असून, काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- ऍड. अनिल परब, परिवहन मंत्री  
 

The deficeite of ST will increase by 802 crore 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The deficeite of ST will increase by 802 crore