गुंतवणुकीचा विचार करताय? नवी मुंबईतील 'हा' परिसर आहे योग्य पर्याय!

गुंतवणुकीचा विचार करताय? नवी मुंबईतील 'हा' परिसर आहे योग्य पर्याय!
गुंतवणुकीचा विचार करताय? नवी मुंबईतील 'हा' परिसर आहे योग्य पर्याय!
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा शिवडी सी-लिंक प्रकल्प, नेरूळ-खारकोपर-उरण लोकल सेवा आणि नैना प्रकल्पासह जेएनपीटी पोर्टचा होत असलेला विकास, यामुळे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा द्रोणागिरी नोड खुणावू लागले आहे. या भागात पायाभूत सुविधांची वानवा असली तरी येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर होणारी रोजगारनिर्मिती आणि पनवेल, उलव्याच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली घरे, ही यामागची कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

द्रोणागिरी नोडची घोषणा झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प येऊ लागले. मात्र, या परिसरात असलेली खारफुटीची झाडे आणि पाणथळ जागा यामुळे येथील बऱ्याचशा विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरूळ-खारकोपर-उरण रेल्वे मार्ग, मेट्रो प्रकल्प यांसारख्या विकास प्रकल्पात गुंतल्याने सिडको प्रशासन येथे पायाभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले. त्यामुळे मधल्या काळात येथील गृह प्रकल्पांकडे लोकांनी पाठ फिरवली. मात्र, मागील 2 वर्षांपासून या ठिकाणचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. सिडकोने येथे आपले गृहप्रकल्प सुरू करण्याबरोबरच रस्ते, नाले, गटारे, क्रीडांगण, उद्याने आदी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेली नेरूळ खारकोपर लोकल, आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या कामाने घेतलेला वेग, यामुळे पुन्हा एकदा दक्षिण नवी मुंबईतील गुंतवणुकीने उभारी घेतली आहे. त्याशिवाय उरण-पनवेल रोड, उरण-मोरा रोड, बेलापूर-उरण रोड या मार्गांमुळे उरण, पनवेल, बेलापूर अशी जवळची शहरे जोडलेली असून, येथे चांगल्या शाळा, रुग्णालय, बॅंक, मॉल व इतर सुविधाही अर्ध्या-एक तासाच्या अंतरावर उपलब्ध आहेत. 

सी-लिंकमुळे मुंबई काही मिनिटांवर 
नेरूळ-उरण लोकल टप्पा 2020 अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. या मार्गावर द्रोणागिरी रेल्वेस्थानक असल्याने त्याचाही फायदा येथील रहिवाशांना होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून द्रोणागिरी नोड 10 किमी दूर आहे. विरार-वसई-अलिबाग रेल्वे, मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे, मुंबई-पुणे-नाशिक अशी रिंगरूट कनेक्‍टिव्हिटी द्रोणागिरी विकासाला चालना देणारी ठरणार आहे. तसेच न्हावा शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळेही द्रोणागिरी नोडचे महत्त्व वाढले आहे. या प्रकल्पामुळे अवघ्या 15 मिनिटांत मुंबईत पोहचता येणार आहे. 
 

सिडकोने पायाभूत विकासकामे सुरू केली आहेत. सेक्‍टर 1 आणि 2 मध्ये रस्ते, गटारे दुरुस्तीचे काम सुरू आहे. सेक्‍टर 12 मध्ये एसपीएच आणि मलनिस्सारणाचे काम घेतले असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. सेक्‍टर 6, 9, 12 मधील रस्ते व इतर कामांसाठी निविदा मागवली आहे. सेक्‍टर 44 आणि 62 मधील भराव करून सपाटीकरण कामासाठी निविदा काढली आहे. सेक्‍टर 47 आणि 55 मधील सामायिक रस्त्यांकरीता निविदा मागवल्या आहेत. 
- प्रिया रातांबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com