कोरोनामुळे लोकांना लागलीये एक चांगली सवय; वाचून व्हाल थक्क...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या संचारबंदीमुळे घरी बसून करायचे काय, असा प्रश्‍न कित्येकांना पडला आहे. अनेकांनी टीव्ही, मोबाईलपेक्षा वाचनच बरे असे म्हणत पुस्तके हातात घेतली आहेत. ज्यांच्याकडे पुस्तके नाहीत त्यांनी ऑनलाईन ई-बुक व ऑडिओ बुकचा पर्याय निवडला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या संचारबंदीमुळे घरी बसून करायचे काय, असा प्रश्‍न कित्येकांना पडला आहे. अनेकांनी टीव्ही, मोबाईलपेक्षा वाचनच बरे असे म्हणत पुस्तके हातात घेतली आहेत. घरातील पुस्तके वाचण्याचा सपाटाच अनेकांनी लावला आहे; मात्र ज्यांच्याकडे पुस्तके नाहीत त्यांनी ऑनलाईन ई-बुक व ऑडिओ बुकचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे ई-बुकच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे. सर्वाधिक खप ऍमेझॉन किंडलवर होत आहे.

ही बातमी वाचली का? लष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका- उपमुख्यमंत्री

याबाबत बुक हंगामाचे विक्रम भागवत म्हणाले, सध्या सर्वजण घरीच आहेत. अशा वेळी वाचनासारखा दुसरा छंद नाही. घरी पुस्तके नसल्याने लोकांचा ई-बुक वाचनाकडे कल वाढला आहे. आठवडाभरात सव्वाशे पुस्तके विकल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या सर्वच प्रकारच्या पुस्तकांना मागणी आहे. या मागणीत आणखी भर पडणार असल्याचे विक्रम भागवत यांनी सांगितले आहे. किंडलवरील काही पुस्तके वाचकांना मोफत सबस्क्राईबही करता येतात. अशा सबस्क्राईब पुस्तकांना मिळणारा वाचकांचा प्रतिसादही चांगला आहे, असे भागवत यांनी सांगितले; तर ऑडिओ बुक्‍सनाही चांगली मागणी आहे. त्यांचा खप किती होत असेल ते सांगणे कठीण आहे, कारण ऑडिओ बुक्‍सच्या सबस्क्रिप्शन पद्धती वेगळ्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कथा, कादंबरी, अनुवाद, ऐतिहासिक, नवीन पुस्तक असे सर्वच प्रकार किंडलवर लोक वाचत आहेत. ज्यांच्याकडे किंडल नाही, ते मोबाईवर पुस्तक डाऊनलोड करून वाचत आहेत. ऑडिओ बुकमध्ये लोकप्रिय असलेले ऍप स्टोरीटेलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे स्टोरीटेलच्या सई तांबे यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? दारू मिळेना... म्हणून तळीराम लढवतायेत ही शक्कल

पुस्तके डाऊनलोड करण्याचे प्रमाण तेवढेच! 
गेल्या आठवडाभरात ई-बुक्‍स मागणीत तसेच किंडलवर पुस्तक वाचण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे; मात्र ब्रोनॅटोवरील पुस्तक डाऊनलोड करण्याचे प्रमाण आहे तेवढेच आहे, असे ई-बुक सेवा पुरवणाऱ्या ब्रोनॅटोच्या शैलेश खडतरे यांनी सांगितले. व. पु. काळे, पु. ल. देशपांडे यांची पुस्तके व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पाठवली जातात; मात्र अशा प्रकारे पुस्तके प्रसारित करणे कॉपिराईट कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे अशा प्रकारची पीडीएफ पुस्तके प्रकाशकांच्या, लेखकांच्या परवानगीशिवाय प्रसारित करू नयेत, असे मत ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे यांनी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In demand for e-book Doubled due to corona