तीन वर्षात मुंबईत विजेची मागणी दुप्पट होणार, वीज उपलब्ध करण्याचे आव्हान

तेजस वाघमारे
Friday, 16 October 2020

महापारेषण कंपनीने तयार केलेल्या आराखड्यानुसार 2023-24 मध्ये मुंबईची विजेची मागणी तब्बल 5 हजार 56 मेगावॅटवर पोहोचणार आहे. ही मागणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापारेषणपुढे आहे.

मुंबई:  मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या विकासकामांमुळे विजेच्या मागणीत कमालीची वाढ होणार आहे. महापारेषण कंपनीने तयार केलेल्या आराखड्यानुसार 2023-24 मध्ये मुंबईची विजेची मागणी तब्बल 5 हजार 56 मेगावॅटवर पोहोचणार आहे. ही मागणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापारेषणपुढे आहे.

सध्या मुंबईला दरदिवशी 2 हजार 600 मेगावॅट विजेची गरज भासते. प्रत्यक्षात मुंबईला वीज पुरवठा करण्याची क्षमता ही 1 हजार 877 मेगावॅट असतानाही विविध मार्गानी ही मागणी पूर्ण करण्यात येत आहे. मुंबईची वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात जमीन उपलब्ध न होणे, सीआरझेड आणि कोस्टल नियमांचा अडथळा येत आहे. त्यामुळे पॉवर स्टेशन उभारणे आणि कॉरिडॉर उभारून वीज सब स्टेशन पर्यंत आणण्यात अडथळे येत आहेत. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून अनेक प्रकल्प रखडले आहेत. हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे महापारेषनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

अधिक वाचाः  लॉकडाऊननंतर महिलांच्या मद्यपानात घट, नशाबंदी मंडळाची माहिती

मुंबईमध्ये उभारण्यात येत असलेले मेट्रो प्रकल्पांना 278 मेगावॅट विजेची गरज आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे 49 मेगावॅट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 50 मेगावॅट, एसआरए प्रकल्प 75 मेगावॅट, महावितरण 232 मेगावॅट आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा विकास होणार असल्याने यासाठी 55 मेगावॅट विजेची मागणी वाढणार आहे. ही सर्व मागणी विचारात घेता मुंबईला दरदिवशी सुमारे 5 हजार 56 मेगावॅट वीज लागेल असेही वाघमारे यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Demand for electricity in Mumbai will double in three years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for electricity in Mumbai will double in three years