लॉकडाऊननंतर महिलांच्या मद्यपानात घट, नशाबंदी मंडळाची माहिती 

सुनीता महामुणकर
Friday, 16 October 2020

"लॉकडाऊननंतर मद्यविक्री पुन्हा सुरू झाली असली तरी पाच महिने दारू न मिळाल्यामुळे महिला आणि पुरुषांमधील मद्याच्या टेस्टमध्ये घट झाली आहे"

मुंबई : लॉकडाऊननंतर मद्यविक्री पुन्हा सुरू झाली असली तरी पाच महिने दारू न मिळाल्यामुळे महिला आणि पुरुषांमधील मद्याच्या टेस्टमध्ये घट झाली आहे, असे नशाबंदी मंडळच्या ( महाराष्ट्र राज्य ) पाहणीत आढळले आहे. यामध्ये सोशल ड्रिकिंग करणाऱ्या नोकरदार महिलांचा अधिक सहभाग आहे, असे मंडळाचे म्हणणे आहे.

मागील पाच महिने मुंबईसह राज्यभरात दारू विक्री बंद होती. तसेच बारही खुले नसल्यामुळे तळीरामांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. परंतु याचाच दुसरा परिणाम असाही झाला की दारुच न मिळाल्यामुळे दारुच्या व्यसनापासून दूर जाण्यास नशेखोरांना सबळ कारण मिळाले. 

महत्त्वाची बातमी : '10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत

लॉकडाऊन हा कालावधी म्हणजे व्यसनमुक्ती करणाऱ्यांसाठी चांगली संधी होती. ज्यामुळे ते स्वतः वर संयम ठेवून दारू सिगारेटपासून दूर जाऊ शकतात. या सवयीचा परिणाम दारु विक्री खुली झाल्यावरही आला, असं नशाबंदी मंडळाच्या 
सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.

ज्या महिला सोशल ड्रिकिंग करायच्या किंवा नैमित्तिकपणे मद्यपान करायच्या त्यांना नंतर दारु विक्री सुरू झाल्यावरही दारूचे आकर्षण वाटत नव्हते. दारुची गरज वाटत नाही, मनावर संयम ठेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

साधारणत: चाळीस टक्के महिलांचा यामध्ये समावेश आहे. पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील या मुली आणि महिला असून प्राधान्याने नोकरदार आहेत. पुरुषांमध्ये हे प्रमाण पंचवीस टक्यांंपर्यत आहे. लॉकडाऊनमध्येही अनेक पुरुष अवैधपणे दारु मिळवित होते, असे आढळले आहे.

महत्त्वाची बातमी :  आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी

लॉकडाऊनमध्ये नशाबंदी मंडळाच्या सहा प्रादेशिक मंडळांंमध्ये (मुंबई, ठाणे, मराठवाडा, विदर्भ इ.) प्रतिनीधींना सहाशेहून अधिक फोनकॉल्स आले. दारु न मिळाल्यामुळे अस्वस्थ वाटत आहे, पोटात मळमळतंय, दुसरा पर्याय आहे का, भूक लागत नाही, नैराश्य आले असे प्रश्न विचारण्यात येत होते. काहिंनी तर कुठे मिळू शकेल, असाही प्रश्न केला होता. नाशामुक्ती मंडळाची राज्यभरात 32 केन्द्र आहेत. मंडळाच्या सोशल मिडिया पेजवरही अनेकांनी समुपदेशनसाठी संपर्क साधला होता.

लॉकडाऊननंतरची स्थिती

  • महिला -- 40 टक्के घट 
  • पुरुष ---- 25 टक्के घट 

बिअर स्टेटस

पूर्वी साधारणपणे तरुण मुले अठरा ते वीस पासून तर मुली पंचवीस वयापासून (कमावते झाल्यावर) मद्यपान करायला सुरुवात करीत. मात्र आता साधारणपणे बारा वर्षांपासून मुले तर अठरा वर्षांपासून मुली दारु, त्यातही बिअर पिण्यास सुरुवात करतात. कॉलेजमधील मुलांना पार्टी करण्यासाठी बिअर आणि सिगारेट स्टेटस वाटते. मंडळाकडे येणाऱ्या पालकांच्या तक्रारींवरुन आणि प्रतिनीधी संपर्कावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

forty percent drop in consumption of liquor by women recorded by detoxification center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forty percent drop in consumption of liquor by women recorded by detoxification center