लग्नापूर्वीची बलात्काराची तक्रार रद्द करण्याची मागणी योग्यच: उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा

सुनिता महामुणकर
Thursday, 28 January 2021

लग्नापूर्वी पत्नीने दाखल केलेली बलात्काराची तक्रार रद्द करण्याची मागणी पतीने करणे यात गैर काहीच नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे

मुंबई  : लग्नापूर्वी पत्नीने दाखल केलेली बलात्काराची तक्रार रद्द करण्याची मागणी पतीने करणे यात गैर काहीच नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच अर्जदार पतीला न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे. 

पुण्यात राहणाऱ्या मध्यमवर्गीय पतीविरोधात त्याच्या पत्नीने लग्नापूर्वी बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची फौजदारी फिर्याद दाखल केली होती. यामुळे पतीने तिच्या इच्छेनुसार तिच्याशी लग्न केले; मात्र लग्नानंतरही पत्नीने स्वतःची फिर्याद मागे घेतली नाही. याबाबत पतीने वेळोवेळी तिला तक्रार मागे घेण्यासाठी विनवणी केली आहे; मात्र त्याला पत्नीने नकार दिला आणि पतीविरोधात पुन्हा भादंवि कलम 498 अची तक्रार दाखल केली. याप्रकरणी अटक होण्याच्या भीतीमुळे त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे जामिनावर सुनावणी झाली. चार वर्षांपूर्वी पत्नीने बलात्काराची तक्रार केली होती. यामध्ये पतीला अटकही झाली आणि जामीन मंजूर झाला.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सन 2018 मध्ये पतीने महिलेला लग्नाबद्दल विचारले. त्यावर तिने 2019 मध्ये होकार दिला. त्यानंतर त्याने फिर्याद रद्द करण्याची विनंती केली; मात्र ती नाकारून पत्नी माहेरी निघून गेली. चालू वर्षी मार्चपर्यंत तो तिला परत येण्यासाठी विनवत होता. त्यानंतर त्याने तिच्या माहेरी जाणे थांबवले. यावर पत्नीने छळाची तक्रार दाखल केली. पतीने लग्न केल्यामुळे पत्नीने तक्रार मागे घ्यावी, अशी त्याची स्वाभाविक अपेक्षा असणार. त्यात गैर काही नाही, असे म्हणत न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश पतीला दिले.

Demand to quash pre marital abuse complaint justified High Court reassures husband

------------------------------

 (संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to quash pre marital abuse complaint justified High Court reassures husband