Mumbai News : गोखले ब्रीजच्या पाडकामाला परेकडून सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai News : गोखले ब्रीजच्या पाडकामाला परेकडून सुरूवात

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले ब्रीजवर पश्चिम रेल्वेकडून तोडकामाला सुरूवात झाली आहे. परेकडून या कामासाठी विशेष अशा मध्यरात्रीच्या ब्लॉकला १० जानेवारीपासून सुरूवात झाली आहे.

येत्या १४ जानेवारीपर्यंत मध्यरात्री १२.४५ ते ४.४५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या कंत्राटदाराकडून ९० मीटरच्या रेल्वेच्या अखत्यारीतील लोखंडी भाग हटवण्यासाठीचे काम हे ब्लॉक दरम्यान सुरू झाले आहे.

महत्वाचे म्हणजे उपनगरीय लोकल वाहतूकीला कोणताही अडथळा न आणता हे काम पार पडणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत ९० मीटरच्या अंतरामध्ये जोडण्यात आलेला गर्डरचा वेगवेगळा भाग सुटा करण्यात येणार आहे.

त्यासाठीच ब्लॉकच्या कालावधीत हा भाग सुटा करून क्रेनने उचलला जाणार आहे. अंधेरी पश्चिमेला या क्रेनला जागा मिळावी म्हणून रेल्वेने पालिकेकडे याठिकाणची जागा मोकळी करावी म्हणून विनंती केली आहे. त्यानुसार क्रेनच्या माध्यमातून हे सुटे भाग लवकरच उचलण्यासाठी सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे.

हे सुटे ब्लॉक तोडता येणार नसल्यानेच क्रेनची मदत याठिकाणी घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून अजय गोपाल मंगल एण्ड कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. रेल्वे गोखले ब्रीजचे ९० मीटरचे बांधकाम पाडून देणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याची माहिती आहे.

या कामाच्या निविदा प्रक्रियेत ११.५ कोटी रूपयांना हे काम कंत्राटदार कंपनीला देण्यात आले. या कामासाठी मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेला १७ कोटी रूपयांचा आगाऊ रकमेचा भरणा याआधीच केला आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरूवात होईल असे अपेक्षित आहे.

जानेवारी महिन्यात या ब्रीजवरील रेल्वेच्या हद्दीतील सांगाडा हटवण्यात येणार आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही नवा गर्डर लॉंच करण्यासाठी कंत्राटदार निश्चित केला आहे. या कामासाठी आठवड्याभरात वर्क ऑर्डर देण्यात येईल असे कळते. अजय गोपाल मंगल एण्ड कंपनीने याआधी कर्नाक, हँकॉक आणि डिलायल ब्रीजचे तोडकाम पूर्ण केले आहे.