विकास आराखड्याला अखेर मुहूर्त मिळाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या मसुद्याला सत्ताधाऱ्यांनी हिरवा कंदील दर्शवल्यानंतर शुक्रवारी (ता.१३) आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे.

नवी मुंबई : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या मसुद्याला सत्ताधाऱ्यांनी हिरवा कंदील दर्शवल्यानंतर शुक्रवारी (ता.१३) आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. या विकास आराखड्यात प्रशासनाने नगररचनेबाबत दाखल केलेल्या तरतुदींवर लोकप्रतिनिधींना हरकती व सूचना मांडता येणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या २८ वर्षांनी महापालिकेच्या चतुःसीमा निश्‍चित होणार आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील २९ गावांचा समावेश करून १ जानेवारी १९९२ ला नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. त्यामुळे तब्बल २८ वर्षांनंतर नवी मुंबई शहराला हक्काची विकास नियमावली मिळणार आहे. नगररचना विभागाने पालिकेच्या अखत्यारित येत असलेल्या १६२.५ चौरस किलोमीटरच्या हद्दीतील जागेची नियमावली तयार केली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास नियमावलीच्या प्रारुप मसुद्यात नगररचना विभागाने १५ आणि १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नियोजन केले आहे. नेरूळ, वाशी, घणसोली, ऐरोली या नोडमध्ये जास्त रुंदीचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. आतापासूनच शहराला भेडसावत असलेल्या वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी अधिकाधिक नोडमध्ये वाहनतळ उभारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच सिडकोकडून पालिकेला येणारे आणि याआधीच हस्तांतर झालेल्या सामाजिक वापराच्या भूखंडांचाही आरक्षणनिहाय समावेश करण्यात आला आहे. या भूखंडांवर कम्युनिटी सेंटर उभारण्यात येणार आहेत. 

शहरातील फेरीवाल्यांची वाढती संख्या लक्षात घेता अधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी मार्केट उभारण्याकरीता भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. नवी मुंबईत येत असणाऱ्या १६ पेक्षा जास्त ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा विकास करण्याची योजना नगररचना विभागाने तयार करून नगरविकास विभागाकडे सादर केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत ४ चटई क्षेत्राचा वापर करून पुनर्विकासाची योजना तयार केली आहे. तसेच या योजनेचा महापालिकेच्या विकास आराखड्यातही समावेश केला आहे. नगररचना विभागाच्या या योजनेला राज्य सरकारने परवानगी दिल्यास झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे. 

नगररचना विभागाने तयार केलेला विकास आराखड्याचा प्रारुप मसुदा येत्या शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. सदस्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
- जयवंत सुतार, महापौर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The development plan has been finalized