
घारापुरीतील विकासकामांना गती - अदिती तटकरे
उरण : घारापुरी बेटाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तयार केलेल्या विकास आराखड्यातील कामांना गती देण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री तथा पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. घारापुरी बेटावर येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत सरपंच बळीराम ठाकूर आणि शिष्टमंडळाने अदिती तटकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर तटकरे यांनी बेटावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीस भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, एमटीडीसीचे सहाय्यक अभियंता नागरे, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. गळती लागलेल्या धरणाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी, शिवडी-न्हावा सी-लिंकबाधित मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई आणि बेटावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीला बंदर विभागाच्या माध्यमातून स्वागत कक्ष बांधून देणे आदी विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बेटावरील प्रस्तावित कामे
बेटावरील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला गळती लागली आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत धरणाच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी पाच कोटींहून अधिक निधीची अपेक्षित आहे.
बेटावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीकडे स्वागत कक्ष नसल्याचे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर स्वागत कक्ष तयार करण्यात यावा.
शिवडी न्हावा सी-लिंकबाधित बेटावरील मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने ती लवकरात लवकर मिळावी.
भारतीय पुरातत्त्व विभाग व शासकीय गाइड यांच्याकडून लोकल गाइड यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. याबाबत योग्य कार्यवाही अपेक्षित आहे.
घारापुरी बेटाच्या विकासासाठी पर्यटन विभागाने आराखडा तयार केला आहे. आराखड्याला भारतीय पुरातत्त्व विभागाकडून मंजुरीही मिळाली आहे; मात्र अद्याप कामे सुरू झालेली नसून ती लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.
- बळीराम ठाकूर, सरपंच, घारापुरी
Web Title: Development Work In Gharapuri Aditi Tatkare Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..