
BJP Mumbai: विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांनी भाजप महायुतीला पाठिंबा देत मतदान केले. नवीन मंत्रिमंडळात उत्तर भारतीय आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती; मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांच्या नाराजीचा फटका येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
चार आमदार असतानाही उत्तर भारतीयांची मते मागणाऱ्या भाजपने एकाही आमदाराला मंत्री केले नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये नाराजी असून, त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी उत्तर भारतीय अभ्यासक जयप्रकाश ठाकूर यांना संधी दिली होती; मात्र यावेळी त्यांचे कार्डही कापण्यात आले.