'व्यक्तीचं जीवन महत्वाचं आहे पण...', देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारसाठी सूचक वक्तव्य

दीनानाथ परब
Thursday, 8 April 2021

'दूध का दूध पानी का पानी' होईल.

मुंबई: "NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेने लिहिलेल पत्र अत्यंत गंभीर आहे. पत्रातला मजकूर आपल्या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. महाराष्ट्रात जे घडतय, जे बाहेर येतय ते महाराष्ट्रासाठी, पोलिसांच्या  प्रतिमेसाठी चांगलं नाही. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्यास सांगितलं आहे.  या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी. त्यातून 'दूध का दूध पानी का पानी' होईल" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

त्याचवेळी त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याकडे लक्ष वेधले. "सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनकडे विशेष लक्ष दिल पाहिजे. रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरु आहे. दुसरी लाट काही राज्यांमध्ये आहे. ज्या राज्यात लाट नाही, तिथून रेमडेसिवीर खरेदी करता येईल का? याकडे लक्ष दिलं पाहिजे. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून  पुरवठा कसा होईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थिती काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्या" असे फडणवीसांनी सांगितले. 

काँग्रेसची स्पष्ट भूमिका, ठाकरे सरकारच्या निर्णयाला केला विरोध

नागपूरमध्ये लॉकडाउन विरोधात व्यापाऱ्यांची आंदोलन सुरु आहेत, त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेण्याधी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करायला हवी होती. व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळेल आणि वाढती कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध कसे अमलात येतील, यादृष्टीने मार्ग  शोधायला हवे होते." "दोन दिवसांचा लॉकाडउन सांगून सात दिवसांचा लॉकडाउन केल्याने व्यापारी आणि सर्वांमध्ये फसवल्याची भावना आहे. व्यक्तीचं जीवन महत्वाचं आहे पण जीवन जगण्याकरती दोन पैसे राहिले नाही, तर जगायचं कसं? या समस्येतून उद्रेकाची भावना तयार झालीय. सरकार आणि समाजाने एकमेकासमोर उभं राहण योग्य नाही. समन्वय कसा घडवता येईल, त्या दृष्टीने काही होताना दिसत नाही" अशी टीका फडणवीस यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra fadnavis slam maharashtra govt over sachin waze letter & lock down decision