काँग्रेसची स्पष्ट भूमिका, ठाकरे सरकारच्या निर्णयाला केला विरोध

दीनानाथ परब
Thursday, 8 April 2021

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी काय म्हटलय?

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. मॉल्स, हॉटेल्स, प्रार्थनास्थळे, दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या निर्बंधांविरोधात आता विरोधाचा जोरदार सूर उमटू लागला आहे. हॉटेल चालक आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. दोन्ही व्यवसायाच्या संघटनांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले आहे. दिवसेंदिवस विरोधाची धार वाढू लागली आहे. मनसे, भाजपा पाठोपाठ आता महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने सुद्धा या कठोर निर्बंधांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. 

"मुंबई आणि महाराष्ट्रातील छोटया-मध्यम उद्योगांना पूर्ण लॉकडाउन परवडणारा नाही. निर्बंधांसह व्यवसायाला परवानगी दिली पाहिजे. हा गंभीर आर्थिक मुद्दा आहे. अर्थव्यवस्था ढासळली, तर कोरोनापेक्षा जास्त बळी जातील" असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

काल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
 "सध्या ज्या प्रकारचा लॉकडाउन करण्यात आलाय. त्यामुळे मोठया प्रमाणात व्यापारीच नाही, तर व्यावसायिक, नोकरदारांमध्ये अस्वस्थतता आहे.  लोकांमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. कोरोना वाढत असल्यामुळे  कडक निर्बंध आवश्यक होते. पण  आताचे निर्बंध कुठलाही विचार न करता घातले आहेत" अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. 

टेन्शन घेऊ नका, मुंबईतील कोरोना स्थितीबद्दल मोठी दिलासादायक माहिती

"वेगवेगळ्या क्षेत्रांशी चर्चा करुन निर्बंध घातले असते, तर अस्वस्थतता  पसरली नसती. मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध सांगितलं होते. पण  आता सातही दिवस लॉकडाउन अशी स्थिती आहे." आता व्यक्ती की, अर्थव्यवस्था असा पर्याय नाहीय. व्यक्ती वाचवण्या बरोबर अर्थव्यवस्थाही महत्त्वाची असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.  

पहिली ते आठवी सरसकट पासच्या निर्णयावरून गोंधळ

मनसेने काय म्हटलय?
"अर्थ चक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर जनता रस्त्यावर उतरेल हे आम्ही आधीच सांगितलं होतं. दंडुकेशहीच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने सुधारणा करावी अन्यथा..... " असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small and medium Businesses cannot bear a full lock down bhai jagtap