
Rashmi Shukla Case (मुंबई): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध विषयांवर चर्चा सुरू आहे. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंग विरूद्ध अनिल देशमुख प्रकरण अशी अनेक प्रकरणे सध्या गाजत आहेत. त्यातच आणखी एक प्रकरण म्हणजे पोलीस दलातील बदल्यांमागील भ्रष्टाचार. पोलीस दलातील रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करून या प्रकरणाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. यावरून मोठ्या प्रमाणावर वादंग झाला. रश्मी शुक्ला यांनी टॅपिंगसाठी जे नंबर सांगितले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळ्याच नंबरचे फोन टॅपिंग झालं, असा अहवाल राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्ला यांच्याविरोधात बनवला आणि सरकारकडे सुपूर्द केला. हा अहवाल त्यांनी लिहिलेला नसून जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक या मंत्र्यांनी लिहिला आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. या आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं.
"सीताराम कुंटेंनी दिलेला अहवाल हा मी लिहिला असा आरोप माझ्यावर आणि इतर मंत्र्यांवर करण्यात आला आहे. अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. तुम्ही सत्तेत असताना सीताराम कुंटे तुमच्याही जवळचे होते, मग रश्मी शुक्लांविरोधात अहवाल लिहिल्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर इतके नाराज का झालात?", असा खोचक सवाल आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांना केला.
"तो अहवाल महत्त्वाचा आहे. कुठल्याही मंत्र्यांनी हा अहवाल अजिबात लिहिलेला नाही. आधी केलेल्या आरोपात काही तथ्य नसतं, म्हणून रोज नवीन आरोप केला जातो. फडणवीस यांनी माझं नाव घेतलं म्हणून मला तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी माझं नाव घेतलं नसतं, तर मी पत्रकार परिषद घेतली नसती. त्यांनी मुद्दाम माझं नाव घेतलं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला", अशी टीका त्यांनी केली.
"सीताराम कुंटे यांनी जेव्हा अहवाल लिहिला आणि मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला तेव्हा मी तिथे नव्हतोच. मी तर घरी पोहे खात होतो. आणि मूळ मुद्दा हा आहे की चुकीची माहिती देऊन फोन टॅपिंगची परवानगी घेणं हे वाईट आहे. रश्मी शुक्ला यांनी जो बदल्यांचा रिपोर्ट दिला आहे त्यात ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत, त्या साऱ्यांचे आता DG लेव्हलचे प्रमोशन होणे अपेक्षित होते. पण अशा आरोपांनंतर वरिष्ठांकडे या अधिकाऱ्यांची फाईल गेली तर ते यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतील आणि त्यामुळे अधिकारी वर्गाचे नुकसान होईल हे नक्की. त्यामुळेच हा अहवाल जाणून बुजून बनवण्यात आला आहे असं म्हटलं तर त्यात काय चुकलं?", असाही प्रश्न आव्हाडांनी विचारला.
तसेच, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अनिल देशमुख हे न्यायमूर्तींवर दबाव टाकू शकतात असा संशय भाजपकडून व्यक्त करण्यात आले. असं म्हणणं म्हणजे न्यायदान पद्धतीवर संशय घेण्यासारखे आहे. असंही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.