फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, पण प्रभारी म्हणून तेच 

टीम ई-सकाळ
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

राज्यपाल भगतसिंग भगतसिंग कोश्यारी यांना मला राज्यात पुढील पर्याय निर्माण होऊपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्याचं आवाहन केलं आहे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मावळल्या तेराव्या विधानसभेची मुदत संपण्यास 24 तासांचा अवधी शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांना प्रभारी मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. 

विद्यमान विधानसभेची मुदत उद्या (ता. 9) सायंकाळी साडेपाच वाजता संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांना आज सायंकाळी सव्वाचार वाजता राजभवनावर जाऊन कोशियारी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी आपला राजीनामा सादर केला. राज्यपालांनी फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जात असल्याने राज्य मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. 

या वेळी फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, संजय कुटे आदी उपस्थित होते. 
पदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेऊन गेल्या पाच वर्षांतील कामगिरीची माहिती दिली. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची उजळणी केल्याने त्यांची आजची पत्रकार परिषद ही त्यांच्या निरोपाची होती, असे मानले जाते. गेली पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल फडणवीस यांनी जनतेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मंत्रिमंडळातील सहकारी, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मित्र पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल आभार व्यक्त करताना फडणवीस यांनी शिवसेना तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेण्याचे टाळले. महाराष्ट्रात खूप समस्या आहेत आणि त्या पुढील पाच वर्षांत संपणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

अडीच वर्षांच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण (व्हिडिओ)

मसुदा नको, मुख्यमंत्रिपदावर बोला : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis will remain as acting cm of maharashtra