गावे, शहरे भक्तीत तल्लीन!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

लाडक्‍या गणरायाच्या आराधनेच्या गणेशोत्सवासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला आहे. ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर सार्वजनिक आणि घरगुती मूर्तींचे आगमन होत आहे. उत्सवाला सुरुवात होण्याच्या आजच्या पूर्वसंध्येला मखरांवर अखेरचा हात फिरवण्यात भाविक मग्न आहेत.

रोहा (बातमीदार) : लाडक्‍या गणरायाच्या आराधनेच्या गणेशोत्सवासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला आहे. ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर सार्वजनिक आणि घरगुती मूर्तींचे आगमन होत आहे. उत्सवाला सुरुवात होण्याच्या आजच्या पूर्वसंध्येला मखरांवर अखेरचा हात फिरवण्यात भाविक मग्न आहेत. व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे अशा जिल्ह्याबाहेरील शहरांमध्ये वास्तव्यास असलेले जिल्ह्यातील मूळ रहिवाशीही मोठ्या संख्येने गावात आल्याने वाड्या, गावे, शहरे गजबजली आहेत. 
गणेशोत्सव हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव. यानिमित्ताने गेल्या १५ दिवसांपासून उत्सवाची तयारी ठिकठिकाणी सुरू होती. आता या उत्सवाला सुरुवात झाली असल्याने जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वाड्या, वस्त्या गजबजल्या आहेत.

या वर्षी थर्माकोल मखर नसल्याने अनेक भाविकांनी कापडी मखर सजवले आहेत. बाप्पाची मूर्ती सर्व ग्रामस्थांच्या सोबत आजच घरी आणून ठेवली आहे. उद्या (ता.२) त्या मखरात बाप्पांची स्थापना करणार असल्याचे रोहा तालुक्‍यातील वाशी गावातील सतीश मगर यांनी सांगितले. पेण तालुक्‍यातील डोलवी गावचे भाविक नरेंद्र माळी यांच्या घरी पाच दिवसांचा गणेशोत्सव असतो. पाच दिवस भजन आणि गाणी म्हणून घरातील मंडळी बाप्पाची संगीतमय सेवा करण्याचे मनोमन ठरवले आहे. 

रोह्यातील झोळाबे गावातील गृहिणी वैशाली म्हात्रे यांनी पाच दिवस पुरणपोळी, मोदकांसाहित पंचपक्वान्नांचे जेवण करणार असल्याने त्याची  तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले. या उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील पेण, रोहा,अलिबाग, खोपोली, महाड या मोठ्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. दोन दिवसांत तब्बल १० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांतून पोलिस कुमकही मागवण्यात आली आहे. सोबत होमगार्ड आणि सुरक्षा दलाची एक टीमही तयार करण्यात आली आहे. हा उत्सव साजरा करताना अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वयंसेवकांच्या मदतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. संशयास्पद हालचाली दिसून आल्यास पोलिसांशी 
संपर्क साधावा.
- अनिल पारस्कर, पोलिस अधीक्षक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devottee Ganesh story of Roha