अत्याचाराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवार यांची भेट

पूजा विचारे
Wednesday, 13 January 2021

अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर मुंडे यांनी पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर मुंडे यांनी पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे ही भेट घेतली. मुंडे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेत आरोपानंतर स्वत:ची भूमिका पवारांसमोर मांडली.

शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची मंत्रालयात बैठक झाली.

धनंजय मुंडे यांचा खुलासा 

धनंजय मुंडे यांच्या विरोधात अत्याचाराची तक्रार करण्यात आली. याबाबत धनंजय मुंडे यांनी स्वतः खुलासा केला आहे.  त्यांच्या विरोधात एका महिलेने मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना निवेदन दिले.

हेही वाचा- ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

काय आहे प्रकरण? 
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने 10 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. तक्रारदार महिलेने तक्रारीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी याची दखल घेतली असून, आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याविषयावर खुलासा केला आहे. संबंधित महिलेच्या बहिणीशी 2003पासून सहमतीने संबंध होते. त्यातून एक मुलगा आणि मुलगी अशी मुलेही झाली. त्यांना माझे नाव दिले असून, त्यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या कुटुंबियांना आणि मित्र परिवारालाही हे महिती असून, त्यांनी मुलांचा स्वीकारही केला आहे, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

Dhananjay Munde meet ncp chief sharad pawar Silver Oak


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde meet ncp chief sharad pawar Silver Oak