esakal | Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

munde

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप होत आहे.

Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय. 

या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या बाबत चर्चा करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे विचारपूर्वक आणि जाणून बुजून पद्धतीने करण्यात आले, शिवाय भाजपच्या एका नेत्याने त्या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण म्हणजे ब्लॅकमेलिंग असावं, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवाय या प्रकरणातील काहीच निर्णय नसेल पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा अशी मागणीही करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप होत आहे. त्यांच्यावर एका महिलेने हे आरोप केल्यानंतर मुंडे यांनी स्वत:च एका फेसबुक पोस्टद्वारे आपली भुमिका सार्वजनिक केली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आणि मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार का? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. विरोधक भाजपानेही हा मुद्दा लावून धरला आहे. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंडेंवरील आरोप गंभीर आहे. पक्ष त्याबाबत विचार करुन तातडीने निर्णय घेईल, असं सूचक वक्तव्य केलं होतं. असं असलं तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं सांगत, पोलिस चौकशीअंती निर्णय घेऊ, असं म्हटल्यानं धनंजय मुंडे यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत काल गुरुवारी प्रप्फुल पटेल यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा  झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या बैठकीत धनंजय मुंडेचा राजीनामा न घेण्याचा राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तक्रारदार महिलेवरच काल दुपारनंतर इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा ब्लॅकमेलिंगचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीने सावध भुमिका घेतलेली दिसून येत आहे. त्यामुळे, तुर्तास राजीनाम्याचा निर्णय होणार नाहीये. राष्ट्रवादीतील एक गट असा होता की ज्यांनी त्यांच्या राजीनाम्याला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, निव्वळ आरोपांच्या आधारे राजीनामा घेणे योग्य नाही, तसेच आरोप सिद्ध झाल्याशिवाय कारवाई करणे अयोग्य आहे, असं या गटाचे मत आहे. याबाबतचा तपास पोलिसांकडे प्रलंबित आहे. या तपासानंतर योग्य निर्णय घेता येईल, असा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे.