धारावीकर करताहेत विजेची काटकसर, बिल कमी करण्यासाठी बेस्ट कार्यालयात गर्दी

संजय शिंदे
Tuesday, 6 October 2020

जुलै महिन्यात वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आले. हे बिल कमी करण्यासाठी ग्राहक बेस्टच्या धारावी डेपोमधील ग्राहक सेवा केंद्राबाहेर गर्दी करत आहेत.

मुंबई : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातच जुलै महिन्यात वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आले. हे बिल कमी करण्यासाठी ग्राहक बेस्टच्या धारावी डेपोमधील ग्राहक सेवा केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळत नसल्याने ऑक्टोबर हिटमध्येही नागरिक घरातील पंखा बंद ठेवून घराबाहेर थांबून बिलात काटकसर करू लागले आहेत.

लॉकडाऊनमध्ये हाताचे काम बंद झाल्याने अनेक कुटूंबाची कुचंबणा होऊ लागली होती. एकीकडे आर्थिक अडचण उभी राहिली असतानाच आलेली वाढीव वीज बिल भरण्यासाठी पैसा कुठून आणायचा असा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. सरकार वीज बिलात सवलत देईल या आशेवर लोक आहेत. मात्र घरकाम, गवंडी काम, भाजी विक्रेते, गृहउद्योग करणारे आदी काम करून घराचा गाडा कसाबसा चालवणाऱ्या कष्टकऱ्यांवर वीज बिलाची कुऱ्हाड कोसळल्याने धारावीत अनेक जणांनी दिवसा वीज वापरणे बंद केले आहे. रात्रीच्या वेळी एखादा बल्ब लावून त्याच उजेडात सर्व काम उरकून घेतली जात आहेत.

गरम होत असल्याने पंखा चालू केल्यास वीज बिल वाढण्याच्या भीतीने महिला आणि लहान मुले दिवसभर घरात न राहता बाहेर बसून राहतात. सध्या अन लॉक चालू झाल्याने पुरुष मंडळी, महिला मिळेल त्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. शाळा बंद असल्याने मुलं आणि महिला घरीच असतात, असे हिलडा नाडार यांनी सांगितले.

  • आम्हाला लॉकडाऊनच्या काळात सरासरी वीज बिल ग्राहकांना देण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे मागील बिलाची सरासरी काढून ग्राहकांना वीज बिल दिले गेले होते. जी कुटुंब गावी निघून गेली होती. त्यांचेही सरासरी बिल दिले होते. जुलै महिन्यापासून घरोघरी जाऊन रीडिंग घेतले जात आहे. त्याप्रमाणे बिलाची रक्कम कमी जास्त होत आहे. ग्राहकांना त्याप्रमाणे बदल करून दिले जात आहे. त्यातच 1 एप्रिल पासून वीज दरात वाढ झाल्याने बिल वाढलेले दिसत आहे. धारावीत नियमानुसार ग्राहकांना वीज बिल देण्यात आले आहे. ज्यांची तक्रार असेल त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे.

मनिषा डावरे, मुख्य अधिक्षक, ग्राहक सेवा 'सी' वॉर्ड, बेस्ट

  • अगोदरच लॉकडाऊन काम नाही पैसे नाही आणि त्यामध्ये वाढीव बिलने कंबरडे मोडले आहे. वीज केंद्रावर सरळ सरळ बिल भरावे लागेल असे अधिकारी उत्तर देताहेत. आमच्या समस्या तर सुटल्या नाहीत मात्र बिल भरावे लागणार नाहीतर हे लोक विद्युत पुरवठा खंडित करतील अशी भीती वाटत आहे. माझ्या घरी 1 ट्यूब, 1 पंखा आणि टीव्ही अशी उपकरणे आहेत.

भीमराव धुळप, मुकुंद नगर, रहिवासी

  • आधी मला 800 रुपये ते 1 हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत होते. सध्या दुप्पट वीज बिल येत आहे. तक्रार केल्यास तुम्हाला वाढीव बिल भरावेच लागेल आम्ही काही करू शकत नाही वरून आदेश असल्याचे कर्मचारी सांगतात.

संदीप कदम, रहिवासी

  • गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वीज बिल जवळपास दुप्पट येत आहे. कुणाला सांगणार आम्हाला कुणीच वाली नाही. सरकारने सर्वांचे वीज बिल माफ केले पाहिजे. कुटुंबाला जगवू कि, वीज बिल भरू अशी विवंचना पडली आहे.

सुनील शेरखाने, रहिवाशी

  • मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन गावी निघून गेलो होतो. चार महिने गावीच होतो. काही दिवसांपूर्वी मुंबईत परतलो असता घर आणि कारखाना यांचे हजारो रुपयांचे वीज बिल आले आहे. काहीच व्यवसाय नसल्याने वीज बिल कुठून आणि कसे भरू अशी पंचायत झाली आहे. बंद घरांचेही मनमानी करून वीज देयक दिले आहे. हे अन्यायकारक आहे.

खुर्शीद शेख, रहिवासी व्यापारी

-------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Dharavi Citizens are saving electricity Crowd BEST office reduce bills


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharavi Citizens are saving electricity Crowd BEST office reduce bills