आता चिंता नको! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून पालिकेसाठी 'ही' आनंदाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता चिंता नको! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून पालिकेसाठी 'ही' आनंदाची बातमी

धारावीतील झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येताना दिसतंय.  रुग्णासोबतच आता या भागातील मृत्यूदरही आटोक्यात आला आहे. 

आता चिंता नको! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून पालिकेसाठी 'ही' आनंदाची बातमी

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. एकेकाळी धारावी हा परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजनांमुळेच धारावीतील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्णासोबतच आता या भागातील मृत्यूदरही आटोक्यात आला आहे. 

धारावीतील झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येताना दिसतंय. जून, जुलैपासून कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणातही घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे. 

दोन दिवसांपूर्वी धारावीत नव्या कोविड १९ रुग्णांचा आकडा हा एकेरी आकड्यात नोंदवण्यात आला.  धारावीत रविवारी फक्त ५ नवे रुग्ण आढळून आलेत. धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत होती. त्यामुळे सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं या भागात मिशन धारावी ही योजना राबवली. त्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आलेत. मिशन धारावीमुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं आहे. 

हेही वाचाः धक्कादायक! कोरोनातून बरे झाल्यानंतरही येऊ शकतो मृत्यू;वाचा तज्ज्ञांनी काय दिली माहिती

१ एप्रिलला दाटीवाटीच्या झोपड्या आणि चाळी असलेल्या धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. चिंतेची बाब म्हणजे, त्याच दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू देखील झाला. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. या परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होणं अशक्य होतं. त्यामुळे तात्काळ दोन ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आली. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या केंद्रांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली गेली. घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी, खासगी डॉक्टर आणि पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सुरू केलेली तपासणी, मोबाइल दवाखाने, तपासणी शिबीर आदी विविध उपाययोजनांमुळे धारावीमधील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात येऊ लागला आहे.

या भागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,६१७ वर पोहोचली आहे. त्यात सद्यपरिस्थितीत, ८८ अॅक्टिव्ह रुग्ण असून २,२७१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा  हॉटस्पॉट ठरल्यानंतर धारावीमध्ये गेल्या महिन्याभरात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकरणांची नोंद कमी झाली आहे. 

अधिक वाचाः कोव्हिडमुळे वाहन उद्योगाला मोठा फटका! व्यवसायात जुलैमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घट

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णसंख्येवर एक नजर टाकूया 

  • धारावीतील एकूण बाधित रुग्ण- २,६७१ 

  • अतिजोखमीचे संशयित रुग्ण- १५,९८० 
  • कमी जोखमीचे संशयित रुग्ण- ४८,६८८ 
  • होम क्वॉरंटाईन- ४७,३५८ 
  • संस्थात्मक विलगीकरणात- १५,२८१
  • बरे झाले- २,२७१ 
  • सक्रिय रुग्ण- ८८ 
  • मृत्यू- २५६ 

 Dharavi reports patients already recovered death rate control