हिरे उद्योग क्षेत्रात १० लाख तरुणांना रोजगाराची संधी, वाणिज्य मंत्रालय प्रोत्साहन देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diamond industry Piyush Goyal Employment opportunities for ten lakh youth mumbai
हिरे उद्योग क्षेत्रात १० लाख तरुणांना रोजगाराची संधी, वाणिज्य मंत्रालय प्रोत्साहन देणार

हिरे उद्योग क्षेत्रात १० लाख तरुणांना रोजगाराची संधी, वाणिज्य मंत्रालय प्रोत्साहन देणार

मुंबई : माणसाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या उद्योगामुळे या क्षेत्राचा विकास होण्याची मोठी संधी दाखविल्यानंतर या प्रयोगशाळेत बनलेल्या हिऱ्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याची ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली. या विषयावर गोयल यांनी मंगळवारी नवीदिल्ली येथे बैठक बोलावली होती. त्यात जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष कॉलीन शहा यांनी या क्षेत्राच्या वाढीमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती दिली. या हिऱ्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा विकास करण्यासाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याची मागणीही त्यांनी केली. ती गोयल यांनी मान्य केल्याचे शहा यांनी सांगितले.

प्रयोगशाळेत बनवलेल्या या हिऱ्यांची निर्मिती वाढली तर घरगुती हिरे उद्योगाची (पैलू पाडणे व पॉलिश करणे) मोठी वाढ होईल. १५ कोटी कॅरेट हिऱ्यांवर प्रक्रिया करताना १० लाख तरुणांना रोजगार मिळू शकतो, तसेच त्यामुळे निर्यातीतून ४० हजारकोटी रुपये मिळण्याची क्षमता त्यात आहे, असेही शहा यांनी यावेळी दाखवून दिले. काँप्यूटर चिप्स, उपग्रह, फाईव्ह जी नेटवर्क यांच्यात हे हिरे वापरले जातात. ते अत्यंत प्रतिकूल वातावरणातही सिलिकॉन चिप्स पेक्षा कार्यक्षमता दाखवतात.

या हिऱ्यांसाठीच्या पीएलआय योजनेचा लाभ घेणाऱ्या उद्योगाला किमान पन्नास कोटी रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. त्याचप्रमाणे शंभर कोटी रुपयांची उलाढालही करावी लागेल, यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीवर आयातशुल्क माफ करण्याचा केंद्र सरकार विचार करेल. सध्या जगातील या हिऱ्यांच्या एकूण उत्पादनाच्या १५ टक्के हिरे भारतात बनतात. मात्र भविष्याचा विचार करता या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी तंत्रज्ञानातही स्वयंपूर्णता हवी यावरही शहा यांनी भर दिला.

Web Title: Diamond Industry Piyush Goyal Employment Opportunities For Ten Lakh Youth Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top