गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही राज्यपालांनी पत्र लिहिले का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?

मुंबई- राज्यातील मंदिर उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरुन राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवण करुन देणारे राज्यपाल कोश्यारी हे सध्या सर्वांच्याच टीकेचे धनी बनले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिलेल्या चोख उत्तरामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रपतींनाही सवाल केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली तर मंदीर बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी मा. राष्ट्रपती  सहमत आहेत का?, असे टि्वट केले. 

आपल्या पुढच्या टि्वटमध्ये त्यांनी म्हटले की, राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?

हेही वाचा- मुंबईतील वीज संकटामागे घातपाताची शक्यता, ऊर्जामंत्र्यांचे टि्वट

'तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोध्येला गेला होता. आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाईची पूजा केली. धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला ‘दैवी संकेत’ मिळत आहेत का? एकेकाळी धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार करणारे तुम्ही अचानक ‘धर्मनिरपेक्ष’ झाला आहात का?', अशा सवालांची जंत्री राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did the Governor also write a letter to the Chief Minister of Goa? Question by congress leader Balasaheb Thorat