पीक विम्याचा अर्ज भरण्यात अडचणी; सोमवारी शेवटचा दिवस असल्याने शेतकरी हवालदिल

मुरलीधर दळवी
Sunday, 18 October 2020

भाताच्या पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीला माहिती सादर करण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मुरबाड : परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुरबाड तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र, भाताच्या पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीला माहिती सादर करण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज सोमवारी (ता. 19) अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. ही मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

अलिबागमध्ये होणार अखंडित वीजपुरवठा; 79 कोटींच्या भूमिगत वीजवाहिन्याच्या प्रकल्पाला मंजुरी

पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे. मुरबाड तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस 15 ऑक्‍टोबर रोजी झाला. त्यानंतर नेटवर्क नसल्यामुळे शेकऱ्यांना पीक विम्याचा अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीमार्फत भात पिकाचा विमा भरला, त्यांना पॉलिसी नंबर मिळालेला नाही. त्यामुळे सोसायटी सचिव व कृषी अधिकाऱ्यांकडे त्यांना धावाधाव करावी लागत आहे. शेतकऱ्यांना नुकसानीबाबतची माहिती ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. मात्र, पाऊस सुरू झाल्यापासून नेटवर्कच विस्कळित झाले आहे. अर्ज भरताना सुरुवातीला ओटीपी येत नसल्याने पुढील अर्ज भरता येत नाही. सोसायटीच्या मार्फत घेतलेल्या कर्जदाराकडे विमा पॉलिसी, अर्ज क्रमांक नाही. अजून पॉलिसीची प्रत शेतकऱ्यांना दिलेली नाही. मदतीसाठी ग्रामसेवक, शेतकी अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

हिरड्यांतील रक्तस्त्रावाच्या समस्येत वाढ! दात घासणे, खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम; तज्ज्ञांचे मत

येथे संपर्क साधा 
ऑनलाईन अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीला द्यायच्या नुकसानीचे नमुना अर्ज भरून ते सेवा सहकारी सोसायटीचे सचिव किंवा कृषी विभागाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विमा कंपनी "इफको टोकियो'चे मुरबाड तालुका प्रतिनिधी प्रकाश म्हाळसे (9226267543, 8369194689) यांच्यांशीही संपर्क साधावा, असे आवाहन मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन प्रकाश पवार यांनी केले आहे. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties in applying for crop insurance Farmers are worried as Monday is the last day