अलिबागमध्ये होणार अखंडित वीजपुरवठा; 79 कोटींच्या भूमिगत वीजवाहिन्याच्या प्रकल्पाला मंजुरी

प्रमोद जाधव
Sunday, 18 October 2020

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या अलिबाग शहराचा वीजपुरवठा खंडित होणे हे पाचवीलाच जणू पुजलेले; पण हे दैन्य संपणार आहे.

अलिबाग : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या अलिबाग शहराचा वीजपुरवठा खंडित होणे हे पाचवीलाच जणू पुजलेले; पण हे दैन्य संपणार आहे. शहरात 22/22 के.व्ही. स्वीचिंग स्थानकाच्या नूतनीकरणाबरोबरच वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येत असल्याने हा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 79 कोटी 2 लाख रुपये आहे. 

नवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ञांचा सल्ला

अलिबाग हे शहर समुद्र किनार्यावर असल्याने पर्यटकांचा बारमाही राबता असतो. असे असले तरी समुद्राचे हेच सानिध्या काही समस्या निर्माण करते. त्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होणे हा प्रश्न अग्रस्तानी आहे. सोसाट्याचा वारा, चक्रीवादळामुळे रहिवाशांना तासंतास अंधारात राहण्याची वेळ येते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी अलिबागमध्ये भूमीगत वीज वाहिन्यांचे काम सुरु करण्यात आले आहे. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाची शनिवारी सुरवात झाली. 
या वेळी नगरपालिकेचे गट नेते प्रदीप नाईक, बांधकाम सभापती ऍड. गौतम पाटील, नगरसेवक महेश शिंदे, अनिल चोपडा, या प्रकल्पाशी निगडीत असलेले विद्यूत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी एस. टी प्रधान व अन्य उपस्थित होते. 

मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

चक्रीवादळ येणाऱ्या संभाव्य राज्यात व केंद्र शासीत प्रदेशात राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प टप्पा - दोन राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या गृह विभागाने घेतला आहे. चक्रीवादळ येणाऱ्या संभाव्य परिसरात चक्रीवादळामुळे कमीत कमी हानी होण्यासाठी योग्य सशक्त पायभूत सुविधा राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वीज वाहिन्यांचे काम सुरू झाले आहे. प्रायोगिक तत्वावर असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला चेंढरे सह अलिबाग शहरात सुरुवात करण्यात आली आहे. 

प्रकल्पावर दृष्टीक्षेप 
- 22/22 के. व्ही स्विचींग स्टेशनचे नुतनीकरण 
- 27 किलोमीटर अंतरापर्यंत उच्चदाब वाहिनी, 45 किमीपर्यंत लघुदाब वाहिनी 
- प्रकल्पाचे क्षेत्र 7.9 चौरस किलोमीटर 
- अलिबाग शहर, चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतचा काही भाग समाविष्ट 
- प्रस्तावीत रोहीत्र ( ट्रान्सफार्मर ) 118 
- भूमीगत वाहिन्या टाकण्यासाठी ट्रॅचींग व ट्रॅच लेस ( हॉरिझॉटल डायरेक्‍शन ड्रीलींग ) पध्दत 
- रोहित्रांची प्रस्तावित उंची जमीनीपासून 1.5 मीटर 
- प्रकल्पाचा सुमारे खर्च 79.02 कोटी रुपये 
- डिसेंबर 2021 पर्यंत हा प्रकल्प पुर्ण होण्याची शक्‍यता 
-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alibag to have uninterrupted power supply 79 crore underground power line project approved

टॉपिकस
Topic Tags: