'डीजी ठाणे'चे भारत सरकारकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे. "डीजी ठाणे' हा उपक्रम सुरू करणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.

'स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेची स्तुती
ठाणे - इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डीजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले आहे. "डीजी ठाणे' हा उपक्रम सुरू करणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.

त्यामुळेच महापालिका स्तरावरून एवढ्या चांगल्या प्रकारे हा प्रकल्प राबविला जात असल्याने केंद्राकडून कौतुक करण्यात आले आहे.
"ठाणे स्मार्ट सिटीज मिशन मर्यादित' अर्थात "टीएससीएल'ने विकासकामांना हातभार लावताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्‍टिव्हिटी आणि सहकार्य या माध्यमातून साध्य केले आहे. नागरिकांद्वारे "सरकार ते नागरिक', "व्यवसाय ते नागरिक' आणि "नागरिक ते नागरिक' सेवा देण्यात "डीजी ठाणे'चे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. सध्या ठाण्यात एक लाख सत्तर हजारांपेक्षा जास्त नागरिक "डीजी ठाणे'ची सेवा घेत आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी "डीजी ठाणे' उपक्रम ठाण्यात सुरू करण्यास विशेष पुढाकार घेतला होता.

"स्कॉच' संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण, स्मार्ट सिटी आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो. "स्कॉच राष्ट्रीय' पुरस्काराने स्मार्ट सिटीच्या "डीजी ठाणे' या विशेष प्रकल्पाला सुवर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या आवास व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने स्मार्ट सिटीचे संचालक राहुल कपूर यांनी विशेष कौतुक केले आहे.

"डीजी ठाणे' या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. डिजिटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचे भारत सरकारकडून कौतुक करण्यात आले आहे. ठाण्यातील सर्व स्तरातील नागरिकांना एका व्यासपीठावर आणणारे "डीजी ठाणे' अल्पावधीत लोकप्रिय झालेले आहे. "डीजी ठाणे'सारखा उपक्रम देशातील इतर शहरांतही राबविण्यासाठी केंद्राकडून आता प्राधान्य दिले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digi Thane India Government Appreciation Scotch National Award